डोंविवली : बसने प्रवास केल्यावर कोरोना होत नाही का? असा सवाल राजू पाटील यांनी ट्विट करत केला आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजू पाटील यांनी ट्विट करत हा सवाल विचारला असून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लवकरात लवकर लोकलसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. बदलापूर,अंबरनाथ, कल्याण,डोंबिवली आणि दिवा येथील नागरिक बससाठी तासनतास रांगा लावत आहेत, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहतूक कोंडी यामध्ये सर्वसामान्य प्रवासी भरडला जात असून 5 ते 6 हजार भाड्याचा खर्च होतो ते कसे परवडेल असेही पाटील म्हणाले. सरकारने दिलासा द्यावा, असं राजू पाटील यांनी म्हटलंय.
संदीप देशपांडे यांचाही प्रश्न
देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 51 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 83,198 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा धोका वाढत असताना महाराष्ट्रातही रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. तसेच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद आहे. याच दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी 'रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल' असं म्हटलं आहे. देशपांडे यांनी गुरुवारी (17 सप्टेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच 'बसच्या गर्दीत कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत होतो, असा सरकारचा समज आहे का? असा थेट सवालही सरकारला केला आहे. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बसमधील गर्दी पाहायला मिळत आहे.