मीरारोड- मीरा भाईंदर परिमंडळ १ मधील सर्व ७ पोलीस ठाणी तसेच उपायुक्त व सहायक आयुक्तांची ४ कार्यालये स्मार्ट झाली असून त्यांना आयएसओ ९००१ - २०१५ प्रमाणपत्र मिळाले आहे. तर वसई परिमंडळ २ आणि विरार परिमंडळ ३ मधील पोलीस ठाणी आणि वरिष्ठ कार्यालये देखील मे अखेरपर्यंत स्मार्ट होतील असे मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडेय यांनी सांगितले.
देशातील पोलीस ठाणी स्मार्ट असायला हवीत असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या गुवाहाटी येथील परिषदेत दिले होते. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री ७ कलमी कृती आराखडा कार्यक्रम अनुषंगाने मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाणी स्मार्ट करण्यास सुरवात केली गेली असे आयुक्त म्हणाले.
स्मार्ट पोलिसिंग संकल्पनेत आयएसओ ९००१ - २०१५ सर्टिफाइड उपक्रमात पोलीस प्रशासन सामान्य नागरिकांसाठी अधिक अनुकूल बनवणे, अधिक प्रशिक्षित पोलीस दल आणि पोलिसिंग मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिका अधिक वापर करणे, आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद उपलब्ध करणे, सतर्क आणि जबाबदार पोलीस दल, पोलिसांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून संवेदनशील आणि विश्वासार्ह असे पोलीस दल समाजासाठी उपलब्ध करणे अपेक्षित होते.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ चे उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सौर कन्सल्टन्सी पुणे यांच्या सहकार्याने स्मार्ट पोलिसिंग संकल्पनाची अमलबजावणी सुरु केली. स्मार्ट पोलिसिंग मध्ये तंत्रज्ञान व दळणवळण, गतिमानता, जनतेशी पोलिसांचे संबंध, पोलिसांचे वर्तन, तपास, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, वाहतुकीचे नियमन, अभिलेख देखभाल, प्रशिक्षण, पोलीस ठाण्यात मध्ये व कार्यालयांमध्ये स्वच्छता राखणे, पोलीस ठाणे व कार्यालयाचे नूतनिकन करणे इत्यादी कामे उपाययोजना उपायुक्त गायकवाड सह तीनही सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार मराठे, दीपाली खन्ना व विवेक मुगळीकर तसेच सर्व ७ पोलीस ठाण्यांचे प्रभारी, अधिकारी व अंमलदार यांनी करण्यास सुरवात केली.
अनेक पोलीस ठाणे व कार्यालयांचा कायापालट केला गेला. आता पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालय, सहायक पोलीस आयुक्त कार्यालय मीरारोड व नवघर तसेच काशिमिरा, मीरारोड व नवघर पोलीस स्टेशन यांना ए प्लस प्लस असे मानांकन मिळाले आहे. तर सहायक पोलीस आयुक्त भाईंदर कार्यालय व भाईंदर पोलीस स्टेशनला ए प्लस आणि नया नगर, उत्तन सागरी व काशिगाव पोलीस स्टेशनला ए मानांकन मिळाले आहे. हे काम यंदाच्या प्रमाणपत्र पुरतेच मर्यादित न ठेवता सौर कन्सल्टन्सी पुणे यांच्यामार्फत २०२८ पर्यंत लक्ष ठेवण्यात येऊन दरवर्षी लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या झालेल्या सुधारणांमध्ये उत्तरोत्तर वाढ करून त्यात सातत्य ठेवले जाईल असे पोलीस आयुक्त यांनी सांगितले.