मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या लेखापरीक्षण विभागास आयएसओ ९००१ : २०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. यापूर्वी पालिकेच्या अग्निशमन, आस्थापना, सामान्य प्रशासन व अभिलेख विभागाला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी घरत यांनी माहिती देताना सांगितले कि, आयुक्त दिलीप ढोले यांनी प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरीकांना त्यांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा व्हावा, यासाठी प्रत्येक विभागाचे विकेंद्रीकरण करुन त्यातील कारभारात सुसूत्रता आणण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रत्येक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना खाजगी संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले. महापालिकेच्या विभागांना आयएसओ दर्जा देण्याकरीता पालिकेने दि एन क्वालिटी सर्व्हिसेस या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. या कंपनीद्वारे सुकाणू समितीची स्थापना करून मुख्य समितीत ४ उपसमित्या स्थापन केल्या. या उपसमित्या संबंधित विभागांचे डॉक्युमेंटेशन, रेकॉर्ड व हाऊसकिपींग, ट्रेनिंग, फिडबॅक देणे आदी कामे करतात.
विभागातील प्रत्येक विषयाच्या विस्तृत व मुद्देसूद लिखाणासह प्रत्येक पदांच्या जबाबदाऱ्या व अधिकार निश्चित करण्यात आले. विभागांतील संकलनानुसार अभिलेख यादी तयार करुन कक्ष अद्यावत करण्यात आला. कक्ष व कार्यालयातील पदनिहाय प्रशिक्षणाच्या विषयांची यादी तयार करुन त्याचे वार्षिक नियोजन करण्यासह वैयक्तिक प्रशिक्षणाच्या नोंदी प्रत्येक विभागात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळेच आयएसओ मानांकन प्रमाणित करून देणारी आयआरक्लास सिस्टम अँड सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेमार्फत पालिकेच्या ५ विभागाना आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
आयएसओ मानांकन प्राप्त झाल्या बद्दल आयुक्त ढोले यांच्या हस्ते प्रभारी मुख्य लेखा परीक्षक मंजिरी डिमेलो, लेखापरीक्षक चारुशीला खरपडे व सेवानिवृत्त लेखा परीक्षक मधुकर सुर्वे आणि के. व्ही. संखे यांचे अभिनंदन करण्यात आले.