डाेंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संरक्षक उपाययोजना म्हणून लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक रस्ते वाहतुकीने प्रवास करत असल्याने कल्याण-शीळ महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. ते या कोंडीत तासन्तास अडकून पडत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. या समस्येची गंभीर दखल घेऊन नागरिकांना कोंडीतून सोडवावे, त्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली आहे.
चव्हाण यांनी बुधवारी फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीबाबत चर्चा झाली. पलावा-शीळ या अवघ्या १२ मिनिटांच्या प्रवासासाठी तासभरापेक्षा जास्त अवधी लागत आहे. त्यामुळे डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर परिसरातून या परिसरात येणाऱ्या नोकरदारांचे प्रचंड हाल होत आहेत.
प्रवासाचे सात तास आणि कामावरचे आठ तास, असा सध्या त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये कामावरच्या तणावापेक्षा प्रवासाचा तणाव जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सातत्याने नागरिक त्याबाबतच्या तक्रारी सांगतात. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी तेथील गर्दीचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांना चाप लावा
- वाहतूककोंडी फोडण्यासाठी चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना वेळीच चाप लावावा. लेनची शिस्त न पाळता केवळ पुढे जाण्याच्या उद्देशाने अन्य वाहनांच्या मध्येच घुसणाऱ्या वाहनचालकांवर सक्त कारवाई करा, अशी मागणी चव्हाण यांनी केली.
- कल्याण-शीळ रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण सध्या सुरू आहे. मात्र, हे काम संथ सुरू असल्याने त्याबाबत सबंधितांना कामे जलद करण्यासाठी सूचना देणे गरजेचे आहे.
- आमदार म्हणून सर्व सहकार्य करण्याची आपली तयारी आहे. मात्र, सामान्यांचा त्रास कमी झालाच पाहिजे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.