लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - भाईंदर व मीरारोड येथील कोविड रुग्णालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व्हेंटिलेटर, बिपअप व नेब्युलायझर मशीन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर खासदार राजन विचारे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची व मृत्यूची संख्या अधिक झपाट्याने वाढल्याने रुग्णालयात अपुऱ्या पडणाऱ्या यंत्रसामुग्री मुळे अनेक रुग्णांचे हाल होत होते. या कोरोना महामारीच्या काळात तिसऱ्या लाटेची संभावना वाटत असल्याने याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने भाईंदरच्या भीमसेन जोशी कोविड रुग्णालयात २ व्हेंटिलेटर, २० बिपअप व २० नेब्युलायझर मशीन, ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचे तसेच प्रमोद महाजन कोविड रुग्णालयात १ व्हेंटिलेटर, ५ बिपअप व १० नेब्युलायझर मशीन आणि ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर सोमवारी उपलब्ध करून देण्यात आले. या प्रसंगी आमदार गीता जैन, महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त संजय शिंदे, मारुती गायकवाड, सहायक आयुक्त सचिन बच्छाव, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्ष नेते प्रवीण पाटील,
माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर, गटनेत्या नीलम ढवण, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर व विक्रमप्रताप सिंग, शहरप्रमुख प्रशांत पलांडे, लक्ष्मण जंगम, मनिष मेहता, जयराम मेसे, उपशहर प्रमुख भगवान शर्मा, महिला उपशहर संघटक तेजस्वी पाटील, नगरसेवक तारा घरत, शर्मिला बगाजी, अनंत शिर्के , कुसुम गुप्ता, वंदना पाटील इत्यादी उपस्थित होते.
खासदार राजन विचारे यांनी या प्रसंगी महाड व चिपळूण मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकाचे सफाई कर्मचारी वृंद, अविश्रांत परिश्रम घेत आहेत. या कर्मचाऱ्यांना, वॉशिंग टँकर, सक्शन मशीन व आदी साधन सामग्री पुरवण्यात आली आहे. यामुळे चिखलाची आणि घाणीची समस्या मार्गी लागत आहे. तरी त्यांना मदतनीस म्हणून मीरा-भाईंदर महापालिकेनेही ५ ते ६ दिवस आपल्या सफाई कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांना पाठविण्याची विनंती केली. तसेच कोव्हीड काळात दिवस-रात्र काम करणारे आयुक्त दिलीप ढोले व सहाय्यक आयुक्त सचिन बच्छाव यांचा सत्कार केला. वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांना नुकताच कोव्हीड काळात उत्कृष्ट काम केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यामार्फत कोव्हीड संजीवनी हा पुरस्कार प्रदान केल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.