ठाणे : दैनिक लोकमतचे संस्थापक तथा स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ने रक्ताचे नाते जपले, ही कौतुकास्पद बाब असून या उपक्रमाचा हिरानंदानी मेडोजचे रहिवासी एक भाग झाले, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक तथा निर्माते रवी जाधव यांनी केले. रविवारी सकाळी हिरानंदानी मेडोज याठिकाणी आयोजिलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी ४६ दात्यांनी रक्तदान केले.
ठाण्यातील हिरानंदानी मेडोज क्लब हाउस येथे हिरानंदानी मेडोज फेडरेशन, ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका स्नेहा आंब्रे आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत रक्ताचं नातं या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक जाधव पुढे म्हणाले, लोकमतने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल खूप आनंद होत आहे. सध्या कोरोनासारख्या साथीच्या आजारांच्या काळात राज्यभर रक्ताचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे अशी रक्तदान शिबिरे काळाची गरज आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमतने रक्ताचे नाते उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित केले, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्रभर जवळपास ५०० ठिकाणी अशा रक्तदान शिबिरांचे लोकमतने आयोजन केले आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराला आणखी प्रतिसाद मिळेल, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी ठाण्याचे भाजप ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, नवी मुंबईच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, हिरानंदानी मेडोज फेडरेशनचे अध्यक्ष जयदीप ठक्कर, भाजपचे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, ठाणे जिल्हा भाजप युवक अध्यक्ष सारंग मेढेकर आणि लोकमतचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हजारे आदी उपस्थित होते.
---------------
* रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान महारक्तदान शिबिर सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करून तसेच शासनाने दिलेल्या सर्व नियमांनुसार करण्यात आले. शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आणि नगरसेविका स्रेहा आंब्रे यांच्या सहकार्याने राबविलेल्या या शिबिरासाठी राजेश सावंत, समीर पॉल, समीर माने, रतन पवार, शुभम त्रिपाठी, पुष्कर लखे, साहील कदम, सागर पवार, अनुष्का शिंदे, सानिका गोडबोले, निमित ललन आणि नीरज मालवी आदींचे सहकार्य लाभले.