अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास खुला होत आहे. परंतु, रेल्वे प्रशासनाने अशा नागरिकांना पास काढण्याची सक्ती केली आहे. तिकीट मिळणार नसल्याने प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तिकिटाचीही सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
राज्य सरकारच्या आदेशानुसार बुधवारपासून रेल्वेने मासिक पास देण्यास सुरुवात केली आहे. पासवर १५ ऑगस्टपासून प्रवासाला मुभा असेल, असे स्पष्टपणे म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे ज्यांना एखाद-दुसऱ्या वेळी प्रवास करायचा आहे, अशांनाही नाहक मासिक पाससाठी शेकडो रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे तिकीट सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी वांगणी रेल्वे प्रवासी संघ, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ आदी प्रवासी संघटनांनी केली आहे. यासंदर्भात संघटना लवकरच रेल्वे प्रशासनाकडे दाद मागणार आहेत.
‘मी कोविड प्रमाणपत्र दाखवून रेल्वे प्रवासाची सुविधा मिळविण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. पण, मला मुंबई अथवा अन्यत्र केवळ एकदा जावे लागते. मला पास परवडणारा नाही. त्याचा रेल्वे व राज्य शासनाने विचार करून नियमात बदल करावा,’ अशी मागणी वांगणी येथील निवृत्त शिक्षक शंकर पंडित यांनी केली आहे. तर, प्रवासी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार म्हणाले, पास सक्ती करण्याचा निर्णय चुकीचा आहे. तिकीट मिळायला हवे. रेल्वे त्यांचे काम टाळत आहे. त्यामुळे याबाबत निश्चित दाद मागावी लागणार आहे. पास दिल्याने वेळ न जाणारे काही जण नाहक सर्वत्र फिरत बसतील. त्यामुळे कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. याचा फेरविचार व्हायला हवा.’
दरम्यान, तिकीट बुकिंग कार्यालयातील क्लार्क किंवा टीसी यांना प्रत्येकाची कागदपत्रे तपासणे शक्य नाही. त्यात खूप वेळ जाईल. त्यामुळे तिकीट सेवा लगेच सुरू करता येणार नाही. जे अत्यावश्यक सेवेत आहेत, त्यांना ती सुविधा आहेच. काही कालावधीनंतर फेरविचार होऊन बदल होतील, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
१२,७११ नागरिकांनी काढला पास
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, बुधवारी दिवसभरात १२ हजार ७११ नागरिकांनी मासिक पास काढला. एरव्ही पास वितरण तुलनेत ही निश्चितच वाढ होती. पण, त्या तुलनेत तिकीट विक्रीच्या संख्येत वाढ झाली नसल्याचे सांगण्यात आले. गुरुवारीही पास काढणाऱ्यांची संख्या वाढलेली होती.
-----------