जितेंद्र कालेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मनोधैर्य खचू न दिल्यास कोरोनावर निश्चितच मात करता येते, असा ठाम विश्वास कोरोनावर मात करुन रुग्णालयातून घरी परतलेले ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे पोलीस नाईक तौसिफ खान पठाण यांनी व्यक्त केला आहे. उपचारादरम्यानच्या अनुभवाची माहिती सहकाऱ्यांना देतांनाच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह आपल्या सर्व सहकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले आहेत.
पठाण यांचा २७ मे २०२० रोजी कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे दुसºयाच दिवशी त्यांना कळवा येथील सफायर रुग्णालयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि शेखर बागडे यांनी दाखल केले. उपचारामुळे, मनोधैर्य खचू न दिल्याने आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आपण कोरोनावर मात करु शकल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांना ४ जून रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सर्व सहकाºयांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
पठाण म्हणाले की, कोरोना हा गंभीर आजार नाही. त्याची भीती बाळगू नये. भीतीला औषध नाही. सुरुवातीला आपल्यालाही भीती वाटली होती. आपल्या परिवारालाही कोरोना होईल, सर्वांनाच रुग्णालयात दाखल करावे लागेल. या धास्तीने मनाचा थरकाप उडाला होता. पण घरातील सर्व मंडळी उपचार घेऊन एकदम बरे झाले आहेत. भारतीयांची रोग प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे कोरोना आपले फारसे बिघडवू शकत नाही.
अगदी माझ्या समोर मधुमेह आणि रक्तदाब असलेले रुग्णही कोरोनातून बरे झाले. ज्यांना या आजाराची अत्यंत भीती वाटली त्यांनाच बरे होण्यास थोडा वेळ लागला. त्यामुळे कोणीही कोरोनाला घाबरु नये. कोरोना होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ठेवण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. भविष्यात आपल्याला मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार होणार नाहीत, यासाठी व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे.