मीरारोड - जुगाराचे व्यसन आणि अय्याशी करण्यासाठी मोबाईल सह क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड चोरून त्याचे पासवर्ड बदलत पैसे काढणे, दागिने खरेदी करणाऱ्या आयटी इंजिनियर याला हरियाणा येथून भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने दिल्ली सह मुंबईमध्ये असे एकूण ८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
भाईंदर पूर्वेच्या न्यूगोल्डन नेस्ट, इंद्रप्रस्थ मध्ये राहणाऱ्या अमीत अग्रवाल यांच्या संकुलाची क्रिकेट मॅच भाईंदर पश्चिमेच्या एका टर्फ मध्ये ३१ मार्च रोजी होती . त्यावेळी त्यांची बॅग ही आतील मोबाईल, क्रेडिट आणि डेबिट कार्ड सह चोरीला गेली. त्या कार्डच्या आधारे ४ लाख ४ हजार रुपयांचा व्यवहार करण्यात आला होता.
या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन उपायुक्त प्रकाश गायकवाड , सहायक आयुक्त दीपाली खन्ना , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी , पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले सह रविंद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, किरण पवार, सुशिल पवार, रामनाथ शिंदे , संजय चव्हाण आणि सलमान पटवे यांच्या पथकाने तपास चालवला होता.
पोलिसांनी घटनास्थळा पासून सीसीटीव्हीचा मागोवा घेत थेट अंधेरीपर्यंतचे फुटेज पडताळले असता त्यात संशियत आढळून आला . त्याचा तपास केला असता त्याचे नाव ट्विकंल अर्जुन अरोरा ( वय ३४ वर्षे ) रा . स्ट्रीट क्र . २२, भिकम कॉलनी, फरिदाबाद, हरीयाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले.पोलीस पथकाने अरोरा याचा हरियाणा येथे जाऊन शोध घेण्यास सुरवात केली . तो फरिदाबादच्या सेक्टर ७३ मधील हाऊस नं. १४९५ मध्ये पोलिसांना सापडला . १६ एप्रिल रोजी अटक करून त्याला भाईंदर मध्ये आणण्यात आले . अरोरा याला २३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्याकडील चौकशीत अरोरा याने भाईंदरसह मुंबईच्या आझाद मैदान , वांद्रे , अंधेरी पोलीस ठाण्यात तसेच दिल्लीच्या वसंत विहार पोलीस ठाणे हद्दीत ३ आणि पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाणे हद्दीत १ असे एकूण ८ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.
अटक आरोपी अरोरा हा सराईत असून आयटी इंजिनियर आहे. त्याला ऑनलाईन जुगाराचे व्यसन असल्याने तसेच ऐय्याशी साठी तो चोऱ्या करत असतो. टर्फ मधील मॅच ची माहिती घेऊन तेथे जातो आणि तेथील बॅग मधील मोबाईल , क्रेडिट - डेबिट कार्ड चोरतो . मोबाईल मिळाल्याने कॉल सेंटरला कॉल करून कार्डचा पिन बदलून घेतो . नंतर त्याद्वारे रोख काढणे , दागिने वा अन्य वस्तू खरेदी करणे अश्या प्रकारे कार्डधारकांची लाखोंची फसवणूक त्याने केली आहे.