लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली जाते. नागरिक लस घेण्यास तयार असताना त्यांना दोन डोस उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. टीबी, कॅन्सर आणि एड्ससारख्या आजारासह आपण जगतो. कोरोनाकाळात संपूर्ण जग बंद करून कसे चालेल, असा सवाल करत मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांनी कॅनडा, अमेरिकेतील लॉकडाऊन काळात तेथील नागरिकांच्या खात्यात पैसे जमा केले. आपल्या इथे नागरिकांच्या खात्यात पैसे टाका, अशी मागणी केली.
मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते रविवारी झाले. याप्रसंगी मनसेचे आमदार राजू पाटील, शहराध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, राहुल कामत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाल्या की, ‘नागरिक विकत लस घेण्यास तयार आहेत. मात्र, त्यांना तीही उपलब्ध करून दिली जात नाही. जे लस विकत घेऊ शकत नाहीत, त्यांना मोफत लस दिली पाहिजे. ज्यांची लस विकत घेण्याची कुवत आहे, त्यांना ती विकत द्यावी. आपल्या देशातून जगाला लस उपलब्ध करून दिली जाते. मात्र, आपल्या देशातील नागरिकांना लस मिळत नाही. त्याची व्यवस्था पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी करावी. लोकांकडून जीएसटी, प्राप्तिकर विविध कर वसूल केले जातात. हा पैसा जातो कुठे? नागरिकांच्या कररूपी पैशातून तरी लस विकत घेऊन ती नागरिकांना मोफत द्यावी. कोरोनाकाळात सर्वसामान्य माणूस सर्व बाजूंनी गांजला असता त्याला विजेची भरमसाठ बिले पाठविली आहेत. ही बिले कमी करण्याचा शब्दही सरकार पाळू शकलेली नाही.’
भाजप आमदारांनी दिली भेट
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ठाकरे येण्यापूर्वी तेथे भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि भाजप माजी नगरसेवक राहुल दामले आले. मनसेच्या शहर कार्यालय उद्घाटनास त्यांनी शुभेच्छा दिल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मनसे आणि भाजपची युतीच्या आधीच जवळीक वाढत असल्याचे चित्र पुन्हा अधोरेखित झाले.
--------------