लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : भाताच्या तुसाच्या गोण्यांच्याआड खैर लाकडांची तस्करी करणाऱ्या ट्रकवर ठाणे वन विभागाने भिवंडीनजीक रविवारी रात्री कारवाई केली आहे. या कारवाईत ट्रक आणि खैराच्या लाकडांसह १४ लाखांचा मुद्देमाल वन विभागाने जप्त केला आहे. पडघा वनक्षेत्रपाल संजय धारवणे हे रविवारी रात्री गस्त घालत असता त्यांना खबऱ्यामार्फत भिवंडीतील वडपा परिसरात मुंबई - नाशिक महामार्गावर एक संशयित वाहनातून खैराच्या लाकडांची तस्करी करत असल्याची माहिती समजली. त्यानुसार त्यांनी ठाण्यातील उपवन संरक्षक गजेंद्र हिरे व मांडवी येथील उपविभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई यांना याबाबत माहिती दिली. गस्तीदरम्यान वडपा हद्दीत शंग्रीला हॉटेलजवळ एक संशयित वाहन उभे असल्याचे दिसून आहे. धारवणे हे या संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी जात असताना वाहनचालकास संशय आल्याने त्याने वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास काही अंतरापर्यंत पाठलाग करून पकडण्यात आले. दरम्यान, चालकाने धावत्या गाडीतून उडी मारून पलायन केल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई हिरे व देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, धारवणे यांच्या नेतृत्त्वाखाली वडपा वनपाल विलास निकम, दिनेश माळी, वनपाल साहेबराव खरे, वनरक्षक जमीर इनामदार, विनोद सिल्व्हेरी, भाऊसाहेब आंबुर्लरकर, कार्यालयीन वनरक्षक संदीप पाटील, पडघा रेंज कार्यालयाचे लेखापाल पंकज जाधव, पडघा रेंज कार्यालयीन कर्मचारी महेंद्र भेरे, वाहनचालक विकास उमतोल, वनमजूर भगवान सवर यांनी केली आहे.
भाताच्या तुसाच्या गोण्यांआड खैराची तस्करी होत असल्याचे उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 11:56 PM