डोंबिवली: घरातील शिडीवरून पडल्याने जखमी झालेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहीती विष्णुनगर पोलिस ठाण्यात बुधवारी सकाळी दिली गेली. परंतू पोलिसांच्या तपासात ३० वर्षीय मुलाची आत्महत्या नाही तर त्याच्या बापानेच त्याचा खून केल्याची धक्कादायक माहीती उघड झाली. मुलाला दारूचे व्यसन होते यात तो आई वडीलांशी वाद घालायचा, त्यांना मारहाण करायचा. या दररोजच्या त्रासाला कंटाळलेल्या बापाने लाकडी दांडक्याने त्याला बेदम मारहाण केली आणि नायलॉन दोरीने त्याचा गळा आवळला.
डोंबिवली पश्चिमेतील सरोवर नगर परिसरात अभिमन्यू पाटील पत्नीसह राहतात. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा गावाला तर लहान मुलगा हरिश हा आईवडीलांसोबत राहायचा. हरिशला दारुचे व्यसन होते. दररोज तो दारुच्या नशेत घरी यायचा आणि आई वडिलांशी भांडण करायचा. मंगळवारी रात्री देखील हरीश दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने वडिलांसोबत भांडण झाले. हरीशची आई हे भांडण पाहून घराबाहेर निघून गेली. काहीवेळानंतर आई घरात आली असता हरीश घरात झोपलेला तीला दिसून आला. परंतू वडील अभिमन्यू यांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी अवस्थेतील हरिषचा दोरीने गळा आवळून खून केला होता. ही बाब अभिमन्यू यांनी बुधवार सकाळपर्यंत लपवून ठेवली होती. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे उघड होताच हरिश रात्री घरातील शिडीवरून पडून जखमी झाला व नंतर तो झोपी गेला. सकाळी उठून पाहिले असता हरिशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव अभिमन्यू यांनी रचला आणि तशी माहिती स्थानिक विष्णूनगर पोलिस ठाण्याला कळविली.
दरम्यान हरिशच्या अंगावरील जखमा पाहून पोलिसांना संशय आला. सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णूनगर वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार आणि पोलिस निरिक्षक गहिनीनाथ गमे, पोलिस उपनिरिक्षक दीपविजय भवार आणि धनंजय दाभाडे यांच्या पथकाने केलेल्या तपासात हरिशचा खून त्याचे वडील अभिमन्यू यांनीच केल्याचे समोर आले. अभिमन्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.