ठाणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्व सहायक आयुक्तांना गुरुवारी दिले. मुख्य कोरोना नियंत्रण कक्ष, बेड व्यवस्था, ॲम्ब्युलन्ससह संपूर्ण आरोग्य यंत्रणा तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोविड रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. नागरिक रस्त्यावर, दुकानांमध्ये, भाजीपाला दुकानांवर मोठी गर्दी करीत असल्याचे आढळले आहे. त्याचबरोबर नागरिकांची रस्त्यावरील वर्दळदेखील वाढली असून, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वावरताना मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे. त्याचबरोबर यासाठी जनजागृती करण्याचा आदेशही दिला आहे.
गेल्या काही महिन्यांत महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील मोठे आहे; परंतु सद्य:स्थितीत प्रमुख रस्ते, बाजारपेठा, मार्केट, तसेच प्रवासादरम्यान नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. त्यामुळे खास बैठक घेऊन आयुक्तांनी या सूचना केल्या.