डोंबिवली : शहरात बुधवारी जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारीही कायम असेल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, गुरुवारी तुलनेने दिवसभर अल्प सरींची बरसात झाली. दुपारी ४ नंतर मात्र काळ्या ढगांनी आकाश व्यापून टाकत पुन्हा हजेरी लावली. या पावसामुळे हवेत गारवा पसरला असल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
पावसामुळे बुधवारी खोळंबलेली कामे पूर्ण करण्यासाठी अनेकजण गुरुवारी सकाळीच बाहेर पडले. त्यामुळे भाजी मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती. फडके रोड परिसरात दुपारी १२.३० च्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. अधुनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली नाही.
केडीएमसीचे अधिकारी, कर्मचारी झाडांच्या छाटलेल्या फांद्या, कचरा उचलण्यात व्यस्त होते. मात्र, अनेक ठिकाणी गटारातून काढलेला गाळ तसाच उघड्यावर ठेवण्यात आला होता. पावसाने भिजून तो गाळ पुन्हा गटारात जात असल्याने नागरिकांनी मनपाच्या सफाई कामावर नाराजी व्यक्त केली. सर्वच प्रभागात अशी स्थिती असल्याने लवकर हा गाळ उचलून न्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
----------------