अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोनापाठोपाठ आता कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण झाला आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे विशेषतः आंघोळ करून आल्यावर प्रत्येकाने कान चांगले पुसावेत, कोरडे करावेत, ओले ठेवू नयेत, असे आवाहन नाक, कान, घसा विकार तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे.
कान ओले राहिल्याने बुरशी, बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. ज्या नागरिकांना मधुमेह, कॅन्सर आहे त्यांनी खूप जपायला हवे, त्यांना या आजाराचा त्रास, इन्फेक्शन लगेच होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांसह लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शाळा-महाविद्यालयाचे वर्ग तसेच खासगी क्लास ऑनलाइनद्वारे सुरू आहेत. तर, नोकरदारांचेही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. त्यामुळे घरांमध्ये एकमेकांचे हेडफोन वापरणे सुरू आहे. कानाचे आजार पसरवण्यासाठी ते सगळ्यात जास्त धोकादायक ठरू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
---------------
पावसाळ्यात ओलाव्यामुळे धोका
१. पावसाचे तसेच आंघोळीच्या वेळी कानात पाणी जाते. ते तेथेच बराच काळ साचल्याने त्रास होतो. कानाला खाज, पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे इंफेक्शन, बुरशी होऊ शकते.
२. कानात टोकदार वस्तू, काडी वगैरे घातल्याने जखम होण्याची शक्यता आहे. बड्स घातल्याने त्या कापसाचे तंतू अडकून इन्फेक्शन होऊ शकते.
---------------
काय घ्याल काळजी?
१. बड्स अजिबात घालून मळ, घाण काढू नये. आंघोळीचे वेळी कानात पाणी जाऊ नये यासाठी कापूस घाला. नखाने कान खोलवर खाजवू नये
२. लहान मुलांच्या कानात तेल टाकू नये. खाज येणे, दुखणे सुरू झाल्यास तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरला दाखवणे.
३. थेट मेडिकलमधून औषध घेऊन उपचार सुरू करू नयेत. कान नेहमी कोरडे ठेवावे, सुती कापडाने स्वच्छ पुसावेत.
-----------
पावसाळ्यात कानाचे आजार वाढल्याचे दिसून येते. त्यासाठी कान कोरडे ठेवणे गरजेचे आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, कॅन्सर रुग्ण आदींनी विशेष काळजी घ्यायला हवी. बड्स, तेल घालू नका. नखाने खाजवून जखम करू नका. खूप खाज आल्यास तत्काळ डॉक्टरकडे जा, परस्पर औषध घेऊन इन्फेक्शन वाढवू नका. टोकदार वस्तू कानात घालून पडदा फाटण्याची शक्यता असते हे लक्षात घ्यावे, सगळ्यांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. श्रेयस शहा, नाक, कान, घसा तज्ज्ञ, डोंबिवली
---------------