मीरारोड - गुगलवर ब्लू डार्ट कुरियरचा नंबर खरा मानून त्यावर कॉल करणे व दिलेली लिंक ओपन करून ५ रुपये पाठवणे मीरारोडच्या आयटी प्रोक्युरमेंट क्षेत्रातील महिलेला महागात पडले. तिची ७८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.
मीरारोडच्या शांती गार्डन सेक्टर ६ मध्ये राहणाऱ्या लक्ष्मी शेट्टी ह्या अंधेरी येथे आयटी प्रोक्युरमेंटचे काम करतात. त्यांच्या कंपनीतील इंजिनियर अबू शमा यांना लॅपटॉप बंगळुरू येथे पाठवायचा असल्याने शेट्टी ह्या ब्लु डार्ट कुरियर सर्व्हिस चा क्रमांक गुगलवर सर्च करत होत्या. त्यावेळी त्यांना कुरियर कंपनीच्या नावे मोबाईल क्रमांक दिसला असता त्यावर कॉल केला. समोरच्या व्यक्तीने शेट्टी यांच्याकडून कुरियर वस्तू बाबत माहिती विचारली ती त्यांनी दिली.
त्या अनोळखी व्यक्तीने शेट्टी यांना कंपनीचे नाव असलेली लिंक पाठवली. शेट्टी यांनी त्यावर ऑनलाइन ५ रुपये पाठवले असता काही वेळात ५ हजार रुपये बँक खात्यातून कमी झाले. त्याबद्दल शेट्टी यांनी समोरच्याला विचारणा केली असता त्याने चुकून झाले असून पैसे परत पाठवतो, प्रोसेस मध्ये आहे, असे सांगितले. परंतु नंतर थोडे थोडे करून एकूण ७८ हजार रुपये शेट्टी यांच्या खात्यातून सायबर लुटारूनी काढून घेतले. अखेर २ ऑक्टोबर रोजी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.