ठाणे : अनाधिकृत बांधकाम, पाणी, लोकलची अशा अनेक समस्यांनी ग्रासलेल्या दिव्यातील नागरिकांना अनलॉक नंतर नवीन समस्येला तोंड द्यावे लागते आहे. आपल्या पोटापाण्यासाठी ठाणे मुंबईसारख्या शहरात कामावर जाताना रोज सहा ते सात तास आपला जीव मुठीत घेऊन येथील चाकरमान्यांना प्रवास करावा लागत आहे. लोकल सेवा नसल्याने अतिशय कमी वाहतुकीच्या पर्यायामुळे आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे. पहाटे पाच पासून बसच्या रांगेत उभे राहावे लागत असून कामावर जाण्यास ९ ते १० वाजत आहेत. त्यातही उशिरा पोहचल्यास लेट मार्क किंवा गैरहजेरी लावली जात आहे. दिव्यातील लोकांना मुंबईत कामावर जायचे असेल तर एकमेव आधार म्हणजे लोकल ट्रेनचा. मात्र सरकारने लॉक डाऊनचे नियम शिथिल केल्यापासून खाजगी आणि सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात जे दिवेकर कामाला जाण्यास निघत आहे, त्यांना रस्ते वाहतुकी शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आधी टीएमटी बस आणि त्यानंतर बेस्टच्या बसेस मधून प्रवास करत त्यांना आॅफिस गाठावे लागत आहे. या बसेस मध्ये चढण्यासाठी दिव्यात तब्बल एक ते दीड किलोमीटरच्या रोजच रांगा लागत आहेत. सकाळी पाच वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे असतात. सोशल डिस्टेसींगचे नियम पाळून बस मध्ये बसवले जाते. त्यामुळे अधिक गर्दी, भांडणे, मारामारी इथे रोज होत असते. टीएमटी बस मधून ठाण्यापर्यंत आल्यानंतर पुन्हा बेस्टच्या बसची वाट बघून त्यातून मुंबईतील आॅफिस पर्यंत पोचावे लागते. हीच कसरत घरी येताना देखील करावी लागते. आॅफिसमध्ये वेळेत न गेल्याने कधी लेट मार्कतर कधी थेट गैरहजेरी लावली जाते असल्याचे येथील चाकरमान्यांचे म्हणने आहे.दरम्यान दिवा ते ठाणे अशा टी एम टी बसेसच्या एकूण ४० फेऱ्या चालवल्या जात आहेत. त्यातील दिवा येथून ठाण्यात येणाऱ्या २० फेऱ्या, ठाणे येथून दिव्याला जाणाऱ्या ११ फेऱ्या आणि आनंद नगर डेपो येथून दिव्याला जाणाऱ्या ८ फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र त्या देखील अपुऱ्या पडत असल्याचे चारकमानी सांगतात. त्यामुळे पहिल्या बसमध्ये जागा मिळावी आणि पुढे ठाण्यातून बेस्ट बस वेळेत मिळावी यासाठी पहाटे पाच वाजल्यापासून येथे बस मिळविण्यासाठी चाकरमानी रांगा लावत असतात. एकीकडे कोरोना चे संकट तर दुसरीकडे पोट भरण्यासाठी कामावर जाण्याची मजबुरी, त्यामुळे दिव्यातून जास्तीत जास्त बसेस सोडण्याची मागणी येथील नागरिक करत आहेत. सरकारने कामावर जाण्यास मुभा तर दिली, मात्र त्यासाठी किती अपरिमित कष्ट नागरिकांना घ्यावे लागत आहेत याचा थांगपत्ता देखील सरकारला नाही.
कामावर जाण्यासाठी लागतात पाच ते सहा तास, दिवेकरांचे हाल सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 3:38 PM