अंबरनाथ (ठाणे) : उल्हासनगरमध्ये वाढत्या गर्मीवर उपाय म्हणून चालत्या गाडीवर अंघोळ करतानाचा व्हिडिओ एका तरुण-तरुणीने तयार केला होता. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी या रिल्स तयार करणाऱ्या तरुण-तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उल्हासनगरमधील आदर्श शुक्ला आणि एका तरुणीने वाढत्या गर्मीवर उपाय म्हणून दुचाकीवर पाण्याची बादली आणि मग्गा घेऊन फिरत चालत्या गाडीवर अंगावर पाणी ओतून घेत असतानाचा एक व्हिडिओ तयार केला होता.
हा व्हिडिओ रिल्सच्या स्वरूपात इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ उल्हासनगरमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. माध्यमांनीही या व्हिडिओची बातमी प्रसारित केली होती. यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी ही रिल तयार करणारा तरुण आदर्श शुक्ला आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोटर वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये या दोघांनाही प्रत्येकी ५ हजार रुपये दंड आणि ६ महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेत असताना त्यामुळे इतर वाहन चालकांचा अपघात होईल, अशी परिस्थिती निर्माण करणे, तसेच हेल्मेट परिधान न करता एका हाताने गाडी चालवणे, असे आरोप गुन्ह्यात या दोघांवर ठेवण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे. दरम्यान, या गुन्ह्यात अटक करण्याची तरतूद नसली, तरी केवळ गंमत म्हणून व्हिडिओ तयार करणे देखील किती महागात पडू शकते, हे यानिमित्ताने समोर आले आहे.