कसारा : अमावस्येच्या रात्री गायब झालेल्या तिघांनी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात, अघोरी विद्येमुळे आत्महत्या केली असल्याच्या चर्चेला मृत तरुणाचे वडील रमेश घावट यांनी पूर्णविराम देत माझ्या मुलासह तिघा तरुणांची आत्महत्या नसून त्यांची हत्याच झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. आमच्या मुलांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यास पोलीस दिरंगाई करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
माझा मुलगा मुकेश व त्याच्यासोबत असलेले अन्य दोन जण हे नातेवाईक आहेत. तिघेही शिक्षित तरुण होते. त्यांचे मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. परंतु, आत्महत्या करताना कोणी सूट कसा घालेल. बूट घालून उंच झाडावर कसा जाईल, असे सवाल रमेश यांनी उपस्थित केले आहेत. पोलिसांनी योग्य तपास करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणीही केली आहे. आम्ही सांगितलेल्या संशयितांना पोलिसांनी तत्काळ अटक करणे गरजेचे असताना त्यांना मोकळीक दिली असल्यामुळे तपास भरकटत असल्याचा आरोप घावट यांनी केला आहे. या घटनेमुळेपोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेमुळे कसारा परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलीस यंत्रणा सर्व बाजूने तपास करीत असून मृत तरुणांच्या नातेवाइकांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. त्यांच्याकडेही काही माहिती असेल, तर त्यांनीही आम्हाला मदत करावी. आम्ही योग्य तो तपास करून पीडित कुटुंबास न्याय देऊ.- नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर