ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आता आदर्श आचारसंहिता लागू झाली असून एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. यातून कोणाही नागरिकाने तक्रार केली तर त्याची तत्काळ दखल घेऊन तासाभरातच तक्रारीवर आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.आदर्श आचारसंहितेचे राजकीय पक्षांकडून किंवा संबंधित उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही, याबाबत मतदारराजालाही करडी नजर ठेवता येणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाइलद्वारे सी व्हीजिल अर्थात सिटीजन व्हीजिल हे अॅप डाउनलोड केल्यास कोणालाही, कोणत्याही ठिकाणावरून थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणच्या प्रचाराबाबतचे वेगळे फोटो किंवा व्हिडीओ आढळल्यास ते याठिकाणी पाठवता येतील. ते फोटो जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाकडे पाठविले जातील. याची माहिती तातडीने भरारी पथकाला दिली जाईल. ओवळा-माजिवडा मतदारसंघासाठी अशा चार भरारी पथकांची नियुक्ती झालेली आहे. साधारण २० ते २५ मिनिटांमध्ये हे पथक तिथे पोहोचल्यानंतर एका तासात यासंदर्भातील कार्यवाही ते करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आचारसंहिताभंगाबाबतचे कोणतेही गैरप्रकार आढळल्यास ते तातडीने या अॅपद्वारे अथवा थेट निवडणूक निर्णय अधिका-यांकडेही नोंदविल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे बागल यांनी सांगितले............................मतदारयादीत अजूनही नाव नोंदवू शकताएखाद्याचे नाव गेल्या निवडणुकीच्यावेळी गहाळ झाल्याचे आढळले असेल, तर त्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे याबाबतची चौकशी करावी. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांची नावे होती, तीच यादी आता विधानसभेलाही असेल. पण, ज्यांची नावे त्यावेळी नव्हती. पत्ते बदलले असतील, अशा मतदारांनी ६ क्रमांकाचा अर्ज भरून द्यायचा आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी हे अर्ज देण्याची मुदत आहे. त्यामुळे अजूनही मतदार आपले नाव मतदारयादीत नोंदवू शकतात, असेही बागल यांनी सांगितले.
आदर्श आचारसंहितेच्या तक्रारीची अवघ्या तासाभरात घेतली जाणार दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 10:50 PM
एखाद्या राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग केल्याचे आढळले तर ‘सी व्हीजिल’ या अॅपद्वारे मतदारांनाही नजर ठेवता येणार आहे. या तक्रारीवर तासाभरातच आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सतीश बागल यांनी रविवारी दिली.
ठळक मुद्देमतदारांना ‘सी व्हीजिल’ अॅपद्वारे ठेवता येणार नजरकोणत्याही नागरिकाला करता येणार तक्रार निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिली माहिती