डोंबिवली : कल्याण रेल्वेस्थानकात पाऊल ठेवताच रेल्वेमार्गातील विष्ठा, कचरा यामुळे येणाऱ्या दुर्गंधीमुळे प्रवाशांना तेथे क्षणभरही उभे राहावेसे वाटत नाही. मोठमोठ्या घुशी रेल्वेमार्ग, फलाटावर वावरत असतात. कोपरे, भिंती यावर पान, तंबाखू खाऊन पिचकाºया मारलेल्या असतात. लांब पल्ल्यांच्या दररोज अडीचशे गाड्यांची होणारी वाहतूक, तर कर्जत-कसाºयाकडे जाणाºया उपनगरीय लोकलच्या ८०० फेºया यामुळे दिवसभर या स्थानकात कमालीची गर्दी असते. रात्रीच्यावेळी या स्थानकाचा ताबा भिकारी, गर्दुल्ले, भटके कुत्रे घेतात. त्यामुळे देशभरातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वेस्थानकांच्या यादीत कल्याणचा लागलेला तिसरा क्रमांक ही आश्चर्याची नव्हे तर खेदाचीच बाब आहे.कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी मुख्यत्वे बाहेरगावाकडे जाणाºया व येणाºया गाड्या थांबतात. या फलाटांवर प्रचंड गर्दी व घाण असल्याने दुर्गंधी येते. त्या तुलनेत अन्य तीन फलाटांची स्थिती बरी आहे. स्थानकात सर्वत्र माश्या घोंघावत असतात. त्यामुळे येथील फलाटांवरील खाद्यपदार्थ सोडाच, पण पाणीदेखील प्यावेसे वाटत नाही. दिवसाकाठी किमान अडीच लाख प्रवाशांचा वावर या स्थानकात असतो. बाहेरगावच्या गाड्यांंमधून लाखोंच्या संख्येने येणारे लोंढे कल्याणमध्ये उतरतात व येथूनच एकतर अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा वगैरे स्थानकांच्या दिशेने किंवा दिवा-मुंब्रा स्थानकांकडे जातात. बाहेरगावाकडील गाड्या उशिरा येतात किंवा सुटतात. त्यामुळे बºयाचदा अन्य ठिकाणांहून आलेली कुटुंबे येथेच आपल्यासोबत आणलेले अन्न खातात. उरलेले तेथेच फेकून देतात. लहान मुलांना स्थानकावरच नैसर्गिक विधीकरिता बसवतात. स्थानकातच पथारी पसरून झोपतात.प्रवाशांसाठी एसी डॉरमेटरीची सुविधा असली, तरी त्यात अवघे ५० ते ७० प्रवासीच थांबू शकतात. लांब पल्ल्यांच्या गाड्या फलाट क्र. ४ ते ६ वरून सुटतात. पण, ही डॉरमेटरीची सुविधा फलाट १ वर असल्याने प्रवासी येथवर येणे टाळतात.स्थानकात सकाळी, सायंकाळी पाऊल ठेवायला जागा नसते, तर सफाई काय करणार? केवळ तीन स्वच्छतागृहे असून अडीच लाख प्रवाशांसाठी ती अपुरी आहेत. या शौचालयांमध्ये सुविधांची बोंबाबोंब आहे. तेथे नैसर्गिक विधी करण्याकरिता पैसे घेतले जातात. मात्र, स्वच्छता ठेवली जात नाही. अनेक शौचालयांत पाण्याचीही धड सोय नाही. रात्री गर्दुल्ल्यांनी शौचालयांचा ताबा घेतलेला असल्याने प्रवासी तेथे जाण्याचे टाळतात. जागा मिळेल तेथे आडोसा पाहून नैसर्गिक विधी करतात.धक्कादायक बाब म्हणजे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. त्यामुळे त्यांची कुचंबणा होते. ‘प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र’ अशी हाक राज्य सरकारने दिलेली असली, तरी या स्थानकात पाणी, शीतपेये यांच्या बाटल्या, वेफर्स व खाद्यपदार्थांची पाकिटे अस्ताव्यस्त पडलेली असतात. कचरावेचक मुले, महिला रेल्वेमार्गात उतरून किंवा फलाटावर फिरून ते कचरा गोळा करत असतात. स्थानकात तीन पादचारी पूल असून ते पुरेसे नाहीत. कल्याण दिशेकडील पूल अरुंद आहे, तसेच मुंबई दिशेकडील पूल जुना झाल्याने त्याला डागडुजीची गरज आहे. मधला नवा एकमेव पूल सुस्थितीत आहे. वर्षानुवर्षे स्थानकाचा विस्तार झालेला नाही. वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार, या स्थानकातून दिवसाला एक लाख तिकिटांची विक्री होते. त्यातून दररोज ७० लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, त्या तुलनेत स्थानकातील सुविधांवर रेल्वे पैसे खर्च करत नाही. त्याचा परिणाम अस्वच्छतेत दिसून येतो.ट्रॅकमध्ये टाकण्यात येणाºया खडींच्या बॅगा येथे इतस्तत: टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकातील काही भागांत विनाकारण गर्दी झाली आहे.कुठेही कम्पाउंड वॉल नाही, त्यामुळे स्थानकाच्या आजूबाजूला राहणारे त्यांचा कचरा सर्रास स्थानकात टाकतात. तो नेमका उचलायचा कोणी, महापालिकेने की रेल्वेने? यावरून वाद होतात. पावसाळ्यात तर स्थानकातील परिस्थिती आणखी बिघडते.
दुर्गंधीमुळे क्षणभरही उभे राहणे मुश्कील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 2:23 AM