लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्वच भागांत जवळपास पावसाळा सक्रिय झाला आहे. अनेक दिवसांनंतर हॉटेलही उघडले आहेत. त्यामुळे अशा वातावरणात जिभेचे चोचलेदेखील वाढू लागतात; परंतु पावसाळ्यात उघड्यावरील खाणे टाळावे, तेलकट, मसालेदार, खाणे टाळावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यातही वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पचनशक्तीवरदेखील परिणाम झालेला असतो. त्यामुळे शक्यतो घरीच बनविलेले अन्न खावे, असेही सांगण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यात पावसाळी वातावरण झाले आहे. त्यामुळे आता खाण्याचेही बेत चांगलेच रंगत असतात. थंड वातावरणात गरमागरम खाण्याची प्रत्येकाची इच्छा होत असते. त्यामुळे उघड्यावर मिळणारे किंवा हॉटेलमध्ये जाऊन गरमागरम वडापाव, भजी, असे पदार्थ हमखास पावसाळ्यात प्रत्येकाच्या खाण्यात येत असतात. घरीदेखील तेलकट, तिखट, मसालेदार पदार्थ खाण्यासाठी प्रत्येकाची जीभ सज्ज असते; परंतु पावसाळ्यात वातावरण बदल होत असल्याने त्याचा मानवी शरीरावर म्हणजेच पचनसंस्थेवरदेखील परिणाम झालेला असतो. अशा वेळेस हे पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यासाठी जड जातात. त्यातूनच आजाराला निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, टायफाइड, कावीळ हे आजार पसरत असतात. वातावरणात माशा पसरल्याने त्यातून अनेक आजार होत असतात. त्यामुळेच घरचे स्वच्छ अन्न आणि हलक्या स्वरूपाचे अन्नच खावे, असे आवाहन आहारतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
पावसाळ्यात हे खायला हवे
अ - जून धान्य खावे
ब - जिल्ह्यात रानभाज्या उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे त्या भाज्या खाव्यात.
क - सूप प्यावे, सैंदव मीठ वापरावे.
ड - लाल भात, साकळेचा भात, हलके अन्न खावे.
पावसाळ्यात हे खाणे टाळायला हवे
अ - उघड्यावरील खाणे टाळावे, पालेभाज्या खाणे टाळावे, मेथी, शेपी, पालक आदी.
ब - समोसा, वडापाव, पाणीपुरी, पिझ्झा आदींसह इतर पदार्थ.
क - मसालेदार पदार्थ.
ड - तेलकट पदार्थ, काकडी, खरबूज, पनीर आदी टाळावे.
रस्त्यावरचे अन्न नकोच
पावसाळा सुरू झाल्याने वातावरण दमट असते. त्यामुळे माशांचे प्रमाण अशा काळात वाढत असते. याच माशा उघड्यावरील पदार्थांवर जाऊन बसतात आणि तेच पदार्थ आपण खात असतो. त्यातूनच आपण स्वत:हून विविध आजारांना निमंत्रण देत असतो. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेच.
...........
पावसाळ्यात झालेल्या वातावरण बदलाचा परिणाम मानवाच्या पचन क्षमतेवरदेखील होत असतो. त्यामुळे तेलकट, मसालेदार किंवा उघड्यावरील पदार्थ खाल्ल्यास ते पचण्यासही जड जातात. त्यामुळे घरी बनविलेले स्वच्छ, हलके पदार्थच खावेत आणि आरोग्याची काळजी घ्यावी.
(डॉ. प्रिया गुरव - आहारतज्ज्ञ, जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे)
पावसाळ्यात वात वाढत असतो, पावसाचे पाणी जमिनीवर पडल्याने, ते दूषित होत असते. तेच पाणी न उकळता, गाळून न घेता, शरीरात गेल्यास, त्यामुळे भूक न लागणे, अजीर्ण, जुलाब, कावीळ, वाताचे आजारही पावसात होत असतात. यकृत विकार, ताप, सर्दी, खोकला, असे विकार वाढतात. त्यामुळे शक्यतो आपण नवीन अन्न म्हणजेच बाहेरचे खाणे टाळावे, पालेभाज्या उदाहरणार्थ मेथी, शेपू, पालक खाणे टाळावे. तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, थंड पदार्थ खाणे टाळावे, थंडी एसीत झोपू नये, दिवसा झोपणे टाळावे, अति व्यायाम करू नये, तर पावसाळ्यात जून धान्य खावे, लाल तांदूळ, साकेसाळीचा भात, गहू, ज्वारी, फुलके, उडीद, मूग खावे, सुके कपडे वापरावेत, अंगाला तेलाची मालिश करावी. उटण्याचा वापर करावा, उकळून गार केलेले पाणी प्यावे, कडक गरम पाण्याने अंघोळ करावी, अशी महत्त्वाची पथ्ये पाळावीत.
(डॉ. हर्षद भोसले, एम.डी. आयुर्वेद)