ठाणे: अचूक वेळेत थर लावणे आणि तो पुन्हा तसाच उतरविणे, अशा प्रो गोविंदाच्या तीन लाख रुपयांच्या बक्षिसासह, नऊ थर यशस्वीपणे लावून सलामी देणाऱ्या मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने पाच लाखांचे बक्षीसही जिंकले आहे. अशा प्रकारे, जय जवान गोविंदा पथकाने एकूण एकूण आठ लाखांचे पारितोषिक जिंकले आहे.
११ प्रो गोविंदांच्या थरांच्या कसरत ठाणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडीला हजेरी लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला.
डीजेच्या तालावर आणि पावसाच्या रिमझिममध्ये सकाळी ११.३० वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत आमदार प्रताप सरनाईक आयोजक असलेल्या वर्तकनगर येथील ठाणे महापालिका शाळेच्या मैदानावर मुंबई ठाण्यातील गोविंदा पथकांचा अमाप उत्साह पहायला मिळाला. याठिकाणी मुंबई ठाण्यातील १४७ गोविंदा पथकांनी रात्री १० वाजेपर्यंत हजेरी लावली.
प्रो गोविंदामध्ये यांनी आणली रंगत-रात्री ८ वाजेनंतर ठाण्याचा राजा, खोपटचा राजा आणि सहयोग गोविंदा पथक या ठाण्यातील तीन गोविंदा पथकांनी नियोजनबद्धपणे थर लावून उपस्थितांची मने जिंकली. तर मुंबईतील जोगेश्वरीच्या जयजवान, आर्यन्स गोविंदा, हिंदू एकता गोविंदा, कोकण नगर, सांताक्रूझच्या विघ्नहर्ता गोविंदा तसेच वडाळयाच्या अष्टविनायक गोविंदा आणि यश गोविंदा पथक तर चेंबूरच्या बालवीर गोविंदा पथकांनी अत्यंत शिस्तबद्धपणे मानवी थर लावून नेत्रदिपक मनोरे रचले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक आणि संस्कृती युवा प्रतिष्ठानचे पूर्वेश सरनाईक, स्थानिक नगरसेवक राजू फाटक तसेच पदाधिकाºयांसह इतर गोविंदांनी पथकांनी मनोरे रचणाºया गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना टाळया वाजवून प्रोत्साहन दिले. यावेळी महिला गोविंदा पथकांनीही चित्तथरारक मनोरे रचून उपस्थितांची दाद मिळविली.
या गोविंदांनी केली बक्षीसांची लयलूट-यावेळी मुंबईतील महिलांच्या पार्ला गोविंदा पथकाने सात थर लावून तर बोरीवलीच्या शिवसाई गोविंदा (पुरुष) पथकाने आठ थर लावून प्रत्येकी २५ हजारांचे बक्षीस जिंकले. याशिवाय, १७ पथकांनी सहा थर, १८ पथकांनी पाच थरांची सलामी यावेळी दिली. यामध्ये मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी एका गोविंदा पथकाचा समावेश होता.
दिवसभरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हजेरीमुळे या भागाला गोविंदाप्रमाणेच पोलीस छावणीचेही स्वरुप आल्याचे चित्र होते.