ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. त्यासाठी ठाण्यातील त्यांच्या मतदारसंघात अनेकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे माझ्या वाढदिनी मी २४ तासांसाठी अज्ञातस्थळी जाणार आहे. त्याचसोबत स्वत:चा फोनही रात्री १२ वाजेपर्यंत बंद करणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले होते मात्र, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांची उपस्थिती दिसून आली. तर, ठाण्यातील याच कार्यक्रमात उपस्थितांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशात कशा घटना घडत आहेत, कशापद्धतीने व्हॉट्सअपद्वारे धार्मिक तेढ निर्माण केलं जातंय. मणीपूरची घटना, जयपूरच्या ट्रेनमधील घटनेचा संदर्भही आव्हाड यांनी दिला होता. आव्हाड यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी, स्वतंत्र भारत जय हो, जय हिंद.. अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यावेळी, गर्दीतील तरुणांनी मोठ्या संख्येने जय श्रीरामचे नारे दिले. त्यामुळे, राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. आव्हाड यांनी कार्यक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. मात्र, या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीतूनच जय श्रीरामचे नारे देत आव्हाड यांना भडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून येतंय.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगितलं होतं की, ५ ऑगस्ट...माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत ५ तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या ५ तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही. मात्र, त्यांच्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात ते दिसून आले.