भार्इंदर - जैन समुदाय एवढा मोठा आहे कि, देशाच्या अर्थव्यवस्थेत या समुदायाचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते जैन समुदायाचे राष्ट्रसंत पूज्यपाद आचार्यदेव श्रीमत पद्मसागरसूरीश्वरजी महाराज यांच्या 84 व्या वाढदिवशी भार्इंदर येथे रविवारी कस्तुरी गार्डन मैदानात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपण महाराजांचा आशिर्वाद प्राप्त करण्यासाठी येथे आल्याचे सांगत त्यांनी आम्हाला नेहमीच विजयाचे आर्शिवाद देणारे आचार्यदेव नयपद्मसागर महाराज यांचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.
व्यक्ती जन्मापासून नव्हे तर आपल्या कार्यामुळे मोठा होतो. त्याचा गुण महाराजांमध्ये आहे आणि म्हणूनच जागतिक स्तरावर त्यांना किर्ती प्राप्त झाली आहे. अशा या किर्तीरुप महाराजांना देण्यासाठी आपल्याकडे काही नसल्याने आपणच त्यांचे आशिर्वाद घेत असतो, तो मोठा उपहार मानला जातो. तरीसुद्धा महाराजांना काहीतरी देण्याच्या उद्देशाने आपण शहरात दहिसर चेकनाका ते भार्इंदर दरम्यान जो मेट्रो प्रकल्प राबविणार आहे. त्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान परिसरातील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामी यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यानी केली. त्याचा ठराव देखील महापालिकेत मंजुर झाल्याचे त्यांनी सांगितले.
महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण एकत्र आल्याने आजचा दिवस सर्वांसाठी भाग्याचा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले. महाराजांनी आपल्या जीवनात राष्ट्रसेवा, समाजसेवा, मानवाप्रमाणेच पशुपक्षींना जगण्याचा अधिकार प्रदान करण्यासाठी राबविलेले जीवदयासारखी कार्ये आपल्याला नेहमीच प्रेरीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जीवदया क्षेत्रातील कार्य केवळ एका समाजापुरती मर्यादित न राहता प्रत्येकाची ती जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. जैन समुदाय जेवढे प्राप्त करतो त्यापेक्षा अधिक तो देण्याचे पुण्यकाम करीत असतो. त्यामुळे या समाजाचे समाजकल्याणात मोठे योगदान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील कोणत्याही संकटात हा समाज मोलाचे कार्य करतो. अलिकडेच केरळमधील नैसर्गिक आपत्तित आचार्यदेव नयपद्मसागरजी महाराजांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधींचे विविध प्रकारच्या जीवनापयोगी साहित्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी आचार्यदेव अभयसूरीश्वरजी महाराज, आचार्यदेव अरविंदसागरजी महाराज, आचार्यदेव मनोभूषणविजयजी महाराज, आचार्यदेव प्रशांतसागरजी महाराज, मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आ. मंगलप्रभात लोढा, आ. प्रताप सरनाईक, आ. नरेंद्र मेहता, माजी आ. मुझफ्फर हुसेन, माजी आ. गिल्बर्ट मेंडोन्सा, महापौर डिंपल मेहता आदी मान्यवरांनी हजेरी लावून महाराजांचे आशिर्वाद घेतले.