- धीरज परब
मीरा रोड : भार्इंदरच्या जेसलपार्क येथील वसई खाडीकिनारा सध्या परदेशी पाहुण्यांनी बहरून गेला आहे. काळ्या डोक्याचे पांढरे शुभ्र सीगल (कुरव- मराठी नाव) या परदेशी पक्ष्यांचे थवे किनाऱ्यावर किलबिलाट करताना पाहायला मिळत आहेत.
महापालिका व लोकप्रतिनिधींच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात कांदळवने, सीआरझेडमध्ये बेकायदा केलेला कचरा-मातीचा भराव आणि विविध बांधकामे करून पर्यावरणाचा ºहास केल्याने वसई खाडीचा जेसलपार्कचा किनारा वादग्रस्त ठरला आहे. पालिकेने खाडी व कांदळवनात बेकायदा सांडपाणी सोडले असून रोज विविध प्रकारचा कचरा, निर्माल्य टाकून प्रदूषणात भर पाडली जात आहे.पर्यावरणाचा ºहास केल्याबद्दल पालिका अधिकारी, ठेकेदारांवर शासनानेच गुन्हे दाखल केले असून लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल करण्याच्या तक्रारी अजून प्रलंबित आहेत. जेसलपार्क येथील वसईचा हा खाडीकिनारा पर्यावरण व जलजीवसृष्टीसाठी संवेदनशील असल्याची ओरड जागरूक नागरिक सातत्याने करतात. काही दिवसांपूर्वीच जेसलपार्क येथील कोळीवाड्याजवळ सात फुटांचा डॉल्फीन खाडीत आला होता. पण, प्रदूषणामुळे त्याचा जीव गेला.
दरम्यान, जेसलपार्कचा खाडीकिनारा सध्या सीगल अर्थात कुरव या समुद्री पक्ष्यांनी गजबजून गेला आहे. काळ्या डोक्याचे हे सीगल खाडीच्या पाण्यात आपले भक्ष्य टिपण्यासाठी झेपावताना दिसतात. सीगलचा थवा पाहिला की, किनाºयावरील चिखलात जणू पिंजलेला कापूस वा पांढºया ठिपक्यांची रांगोळीच काढल्याचा भास होतो. त्यांचा किलबिलाट आणि त्यांचे सौंदर्य सर्वसामान्यांना भुरळ घालणारे आहे.
युरोपीय व आशियाई देशांतून आलेले हे पाहुणे थंडीच्या मोसमात येथे दाखल होतात. यंदा ते आॅक्टोबरच्या अखेरपासून हळूहळू येण्यास सुरुवात झाली. हे सीगल येथे मिळणारा आहार व वातावरणानुसार जानेवारीपर्यंत वा त्यानंतरसुद्धा काही काळ थांबतात.दरवर्षी येणाºया या परदेशी पाहुण्यांबद्दल स्थानिकांनासुद्धा फारशी माहिती नाही. त्यामुळे ते त्यांना गाठिया, फरसाण, शिळ्या चपात्या आदी खाण्यास टाकतात. खाडीत मासळी आधीच नगण्य झाली असून खाडीकिनारा स्वच्छ ठेवण्यासह येथील सांडपाण्याचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज बनली आहे. किनाºयावरील चिखलात न्युटी माशांची वाढ तसेच खाडीतील विविध माशांची वाढ होण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रयत्न होणे ही काळाची गरज असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.