ठाणे : ठाणे महापालिका आयुक्तांना धमकी आली तेव्हा त्यांनी पोलीस आयुक्तांना फोन करणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे न करता थेट मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोन केला. म्हणजे आयुक्त आणि मुख्यमंत्री यांच्यात जवळीक आहे. जयस्वाल यांच्यासारखी जवळीक असलेली माणसे मुख्यमंत्र्यांनी महापालिकेत पाठवली मग त्यांच्याकडूनच घोटाळे झाले नसतील हे कशावरून, असा सवाल करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयुक्त जयस्वाल आणि मुख्यमंत्री फडणवीस हेच ठाणे महापालिकेच्या घोटाळ््यात सामील असल्याचा आरोप केला. ठाण्यातील मासुंदा तलावानजीक जाहीर सभेत ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, ज्या गुंडाने आयुक्तांना फोन केला, त्याला कदाचित आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध ठाऊक असतील म्हणूनच अशा प्रकारे कॉल करुन थेट भाजपात प्रवेश करता येऊ शकतो असे त्याला वाटले असेल. म्हणूनच त्याने हा धमकीचा कॉलही केला असेल असा चिमटा त्यांनी यावेळी जयस्वाल यांना काढला. महापालिकेत भ्रष्टाचार झाला असे मुख्यमंत्री म्हणतात तर मग दोन वर्षे तुम्ही नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नव्हते का, असा सवाल त्यांनी फडणवीस यांना केला. भाजपाच्या पारदर्शकतेची खिल्ली उडवताना ‘देवेंद्र लस्सी’ ही पारदर्शक असून त्यात काहीच दिसत नाही, असे सांगितले. शिवसेनेला गुंडांचा पक्ष म्हणता मग तुमच्या भिवंडीच्या उपाध्यक्षाने कशा निर्घृण पद्धतीने हत्या केली. त्याला अद्याप अटक का झाली नाही, त्याला पाठीशी कोण घालत आहे, असे सवाल त्यांनी केले. आमच्या सारखे शिवसैनिक आता तुम्हाला चालत नाहीत, आता तुम्हाला पप्पू कलानी लाडका वाटतो हे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे ठाकरे म्हणाले. मुंडे यांनी तर पप्पू कलानीची तुलना रावणाशी केली होती. आता तोच रावण आपल्याला सत्तेसाठी हवाहवासा वाटतोच कसा? त्याच्या बरोबर युती करता याचा अर्थ कोणता पक्ष गुडांना थारा देतो हे जाणकार मतदारांना सांगायची गरज नसल्याचेही ते म्हणाले. परंतु आता भाजपाच्या गुंडांनी आमच्या माता, भगिनींना वाकड्या नजेरेने पाहिले, त्यांची छेड काढली तर माझा शिवसैनिक त्याचे हात तोडून तुमच्या हातात दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी भाजपाला दिला. भाजपने निवडणुकीच्या काळात जाहिरातींवर केलेला खर्च हा मंगळ यानाच्या खर्चापेक्षा जास्त आहे. मंगळयानासाठी साडेचारशे कोटींचा तर मोदींच्या जाहिरातींवर अकराशे कोटींचा खर्च झाला आहे, असा दावा करून ठाकरे म्हणाले की, गेली पाच वर्षे मेहनत आम्ही केली, ठाण्याचा विकास केला आणि तुमच्याकडे काहीच नव्हते म्हणून आता हे सगळे आम्हीच केले, असा बोलबाला करीत आहात. इथे मुख्यमंत्री खोटे दावे करीत आहेत तर तिकडे मोदीही पोकळ घोषणाबाजी करीत आहेत, असा टोला त्यांनी केला. (प्रतिनिधी)
जयस्वाल, फडणवीस हेच घोटाळ््यांना जबाबदार
By admin | Published: February 18, 2017 4:37 AM