बदलापूर : ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांनी हातात हात घालून चांगल्या योजना हाती घेतल्या आणि त्याला ग्रामस्थांचे सहकार्य मिळाल्यावर गावाचा कसा चांगला विकास होऊ शकतो, याचा ‘आदर्श पॅटर्न’ म्हणजे जांभूळ गाव. त्यात सुभाष पिसाळ यांच्यासारख्या विकासाची दृष्टी ठेवून कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याचे मार्गदर्शन लाभल्यावर गावात चांगला इतिहास घडू शकतो, हे आजच्या या विकासकामाच्या धडाक्याने सिद्ध केले, असे गौरवोद्गार आमदार किसन कथोरे यांनी काढले.तालुक्यातील जांभूळ गावात चौदाव्या वित्त योजनेंतर्गत आदिवासी समाजासाठी उभारण्यात आलेल्या मंगल कार्यालयाचे उद्घाटन, जिल्हा क्रीडा विभागांतर्गत कबड्डीपटूंसाठी जिल्ह्यातील पहिले मॅट क्र ीडांगण, ग्रामपंचायत ग्रामनिधीमधून आगरी, बौद्ध, आदिवासी, मराठा आदी समाजबांधवांसाठी भांडी व साहित्यवाटप असे विविध कार्यक्र म शनिवारी रात्री कथोरे यांच्या उपस्थितीमध्ये झाले.जांभूळ गावाचे सॅटेलाइटमार्फत सर्वेक्षण करून घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ते झाल्यावर गावातील प्रत्येक ग्रामस्थांना अद्ययावत मोजणी झालेले प्रॉपर्टीकार्ड देण्यात येईल. त्यामुळे भविष्यात या गावात जमिनीच्या हद्दीवरून भांडणे होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही, असा विश्वास कथोरे यांनी व्यक्तकेला.भविष्यात पाण्यावरून भांडणे होण्याची शक्यता लक्षात घेऊन जांभूळ गावात पंतप्रधान जलजीवन मिशनअंतर्गत जलकुंभ उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. जांभूळ गावाचा समावेश अंबरनाथ तालुक्यात लवकरच होईल, मात्र पालिकेत त्याचा समावेश न होता भविष्यात महापालिका होईल, त्यावेळी मात्र जांभूळचा समावेश महापालिकेत होईल. जांभूळ गावाला कबड्डीपटूंचा फार मोठा इतिहास आहे. तसाच इतिहास घडला आहे. ठाणे जिल्ह्यातील कबड्डीचे पहिले मॅटचे क्रीडांगण गावाला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.।सरकार बदलले तरी माणसांनी बदलू नये : सरकार बदलले तरी माणसे बदलू नये. जांभूळ गाव हे विकासाच्या धाग्याने एकत्र बांधले गेले आहे. या विकासकामांमुळेच जांभूळ गावात एकोपा, शांती, सुबत्ता नांदत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पिसाळ यांनी सांगितले. सरपंच नरेश गायकवाड, उपसरपंच परीक्षित पिसाळ, माजी सरपंच अर्चना राणे, ग्रामसेवक बाळू कोकणे, पोलीस पाटील दत्ता सावंत, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भगवान पिसाळ, चंद्रकांत पिसाळ, काशिनाथ आयरेकर, लक्ष्मणबुवा जाधव आदी उपस्थित होते.
जांभूळ गाव हा विकासाचा आदर्श पॅटर्न- किसन कथोरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 11:48 PM