लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्या खूनातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यामुळे न्यायालयाने त्याला आता १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.शेख यांच्यावर २३ नोव्हेंबर रोजी राबोडीमध्ये गोळीबार झाला होता. त्यावेळी शाहीदने मोटारसायकल चालविली होती. तर त्याच्या मागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने जमील यांच्यावर गोळीबार केल्याची बाब तपासात समोल आली होती. दरम्यान, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच जमील यांचा मृत्यु झाला होता. या घटनेने राबोडीमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाकडून करण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने राबोडीतून २५ नोव्हेंबर रोजी शाहिद शेख याला खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर दोन वेळा त्याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली होती. त्याच्या कोठडीची मुदत ८ डिसेंबर रोजी संपली. त्यामुळे मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करुन आणखी एक दिवस वाढीव पोलीस कोठडी देण्याची मागणी ठाणे पोलिसांनी केली. तपास अपूर्ण आहे. शाहीदच्या साथीदारांचा शोधही बाकी आहे. तसेच खूनासाठी वापरलेले रिव्हॉल्व्हरही मिळालेले नाही. या सर्व बाबी पुन्हा पोलिसांनी न्यायालयासमोर मांडल्या. मात्र, जवळपास १४ दिवस पोलीस कोठडी दिली आहे. आणखी पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यास न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे शाहीदची मंगळवारी अखेर ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. गरज पडली तर न्यायालयाच्या परवानगीने शाहीदची कारागृहात जाऊन चौकशी करण्यात येईल, असेही तपास पथकातील एका अधिकाºयाने ‘लोकमत’ला सांगितले.
जमील शेख हत्याकांड: शाहीदची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2020 3:50 PM
जमील शेख यांच्या खूनातील एक आरोपी शाहिद शेख याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यामुळे न्यायालयाने त्याला आता १५ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्दे न्यायालयाने नाकारली पोलीस कोठडी अन्य आरोपींचा शोध सुरुच