शहापूर : शहापूरसाठी जपानी पद्धतीची नळपाणी योजना मंजूर करणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली.
शहापूर नगरपंचायतीकडून नागरिकांना होत असलेला दूषित व मातीमिश्रित पाणीपुरवठा, जीर्ण झालेले जलकुंभ व शुद्धिकरण प्लांटसंदर्भात भाजपचे शहापूर शहराध्यक्ष विवेक नार्वेकर यांनी कथोरे यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. ही तक्रार करताच कथोरे यांनी राज्याचे जीवन प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन शहापूरला भेडसावत असलेल्या पाण्याच्या समस्ये संदर्भात चर्चा केली. त्यावेळी शहापूरला जपानी तंत्रज्ञानाची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वैदेही नार्वेकर, महेश काबाडी, मयुरेश भोपतराव, प्रियेश जगे, जगदीश गवळे, गणेश धसाडे व चेतन चौधरी आदी उपस्थित होते.