ठाणे : क्योटो सांगयों विद्यापीठ, क्योटो जापानचे सांस्कृतिक विभागाचे विद्यार्थी विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी बेडेकर ( स्वायत्त ) महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक आदान- प्रदान कार्यक्रमांतर्गत रविवारी दाखल झाले. हा कार्यक्रम २० तारखेपासून ३० तारखेपर्यंत चालणार आहे. यामध्ये त्यांना योग, हिंदी आणि इंग्रजी संभाषण शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर कोकणातील ग्रामीण भागाला ते भेट देणार आहेत अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाने दिली.
हे विद्यार्थी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी भारतातील विद्या प्रसारक मंडळाच्या के . ग . जोशी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड एन . जी. बेडेकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त) ठाणे येथे आलेले आहेत. प्राच्य विद्या संस्थेत उद्घाटनपर भाषणात बोलताना विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी नि:संकोच भारतीय संस्कृती बद्दल प्रश्न विचारून अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. दोन्हीही देशांची संस्कृती मिळती - जुळती असल्याकारणाने मागील सात वर्षापासून हे विद्यार्थी आपल्या मागविद्यालयात येत असतात. त्यात ते योग शिकतात तसेच हिंदी शिकतात आणि त्याचबरोबर इंग्रजी संभाषण कला ते अवगत करून घेण्याचा प्रयत्न करतात. हा कार्यक्रम दहा दिवस चालत असतो.
विद्या प्रसारक मंडळ आणि क्योटो सांगयों विद्यापीठ, क्योटो जापान यांच्यात सामंजस्य कराराचे हे फलित आहे. या कार्यक्रमाला एन . एस. एस. चे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते. वरिष्ठ प्राध्यापक ग्रंथपाल नारायण बारसे, उपप्राचार्य सुभाष शिंदे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत . जापानी दहा विद्यार्थिनी व दहा विद्यार्थी सह प्रा. कोइकुनी शिगा व मिस मुस्तानी ओहिरा हे दोन प्राध्यापक सोबत आले आहेत. विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी डॉ. महेश बेडेकर, सदस्य डॉ. सुधाकर आगरकर आणि इतरही प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. आगरकर यांनी केले.