हुसेन मेमन लोकमत न्यूज नेटवर्क जव्हार : जव्हार प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई-विरार यांच्या माध्यमातून जव्हार येथे गुरुवारी आरटीओ कॅम्प चालविला जातो. मात्र, या कॅम्पला आरटीओचे अधिकारी आपल्या मर्जीनुसारच्या वेळेत येत असल्याने नागरिकांना अनेक तास वाट पाहत बसावे लागते. परिणामी, नागरिकांचा मोठा खोळंबा होत आहे. जव्हार येथे वाडा मार्गावर आमराई गार्डन येथे एका माळावर वाहनचालकांची पाहणी करून त्यांना वाहन चालविण्याचा परवाना देण्याची व अन्य कामे आरटीओकडून होतात. अनेक वर्षांपासून हा कॅम्प सुरू असला तरी अद्यापही कायमस्वरूपी जागा आरटीओला उपलब्ध होऊ शकलेली नाही.
वाहनचालकाने वाहन चालविण्याचा परवाना मिळावा यासाठी येथे नोंदणी केली असता त्याला आरटीओमार्फत भेटीसाठी ठरावीक वेळ दिली जाते. जी साधारण सकाळी ११ च्या सुमाराची असते. वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागातील वाहनचालक परवान्यासाठी येथे वेळेत उपस्थित राहून रांगा लावतात. मात्र येथील अधिकारी मनात येईल तेव्हा, स्वत:च्या वेळेप्रमाणे उपस्थित राहतात. त्यामुळे ते अधिकारी येईपर्यंत नागरिकांना उन्हातान्हात ताटकळत उभे राहावे लागते. परिणामी, वाहनचालकांचा हिरमोड होतो. दुसरीकडे प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांच्या सोयीसाठी ऑनलाइन नोंदणी करून दलालांकडून होणारी फसवणूक टाळण्याचा चांगला निर्णय घेतला असला तरी आजही आरटीओच्या बाजूला दलालांचाच वेढा दिसतो. सामान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
मला सकाळी ११ ची वेळ दिली होती ; मात्र, अधिकारी १.४० ला आल्याने उन्हात ताटकळत राहावे लागले.- मुकेश पाटील, वाहनचालक
ऑनलाइनद्वारे नोंदणीने लूट थांबेल, अशी अपेक्षा होती.मात्र, आरटीओभोवती दलालांची गर्दी आहे. - भीमराव बागुल, अध्यक्ष, गवंडी बांधकाम मजूर संघटना