- सदानंद नाईक
उल्हासनगर : सोमवारी होणाऱ्या विशेष महासभेत स्थायी व विशेष समिती सदस्याची निवड होण्यापूर्विच सभापती पदासाठी भाजपच्या वरिष्ठ नगरसेविका जया माखिजा यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब झाले. यापूर्वीही जया माखीजा यांनी दोन वेळा समितीच्या सभापती पदी राहिल्या असून त्यांच्या कालावधीत अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे.
उल्हासनगर महापालिका स्थायी व विशेष समिती सदस्याची निवड सोमवारच्या विशेष महासभेत होणार आहे. स्थायी समितीच्या निवृत्त झालेल्या ८ सदस्याच्या जागी भाजपचे ६ तर शिवसेनेचे दोन सदस्य निवडून जाणार आहे. दरम्यान शिवसेनेची साथ सोडून भाजपात परतलेल्या ओमी टीम समर्थक नगरसेवकांना स्थायी समिती ऐवजी विशेष समिती मध्ये सत्तेचा वाटा देण्याचे ठरले आहे. स्थायी समिती मध्ये भाजपचे बहुमत असल्याने सभापती पदी कोण? असा प्रश्न विचारला जात होता. याला शहर जिल्हाध्यक्ष जमणुदास पुरस्वानी यांनी पूर्णविराम देत, स्थायी समिती सभापती पदी वरिष्ठ नगरसेविका जया माखिजा निवडून जाणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. भाजप कडून राजू जग्यासी, राजेश वधारिया, कविता पंजाबी, कंचन लुंड असे सहा जनाची नावे निश्चित झाल्याचे संकेत भाजपचे स्थानिक नेते देत आहेत.
महापालिका स्थायी समिती मध्ये भाजपचे बहुमत असलेतरी, भाजपकडे सभापती पद जाऊ नये. यासाठी फाटाफूट होण्याची चर्चा शहरात रंगली आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असताना, गेल्यावेळी महापौर व उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेने राजकीय खेळी करीत ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना गळ्याला लावून महापौर, उपमहापौर निवडून आणले. तशीच खेळी स्थायी व विशेष समिती सभापती पद निवडीच्या वेळी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या शक्यता तेतून ओमी कलानी टीम समर्थक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य पद दिले नाही. त्यांची विशेष समिती सदस्य पदावर बोळवण केले आहे. तर पक्ष जी जबाबदारी देईल, ती स्वीकारणार असल्याची प्रतिक्रिया जया माखिजा यांनी दिली आहे.
शहरावर दोन दशक सत्ता गाजविणाऱ्या कलानी समर्थकांना विशेष समिती?
कलानी कुटुंबातील पप्पू कलानी हे सलग २० वर्ष तर ज्योती कलानी ५ वर्ष आमदार होते. तसेच दोघेही नगराध्यक्ष राहिले आहेत. ज्योती कलानी सलग ७ वेळा स्थायी समिती सभापती पद तसेच महापौर पद भूषविले आहे. पंचम कलानी याही महापौर राहिल्या आहेत. शहरावर दोन दशके पेक्षा जास्त सत्ता गाजविणाऱ्या कलानी कुटुंबाने विशेष समिती सभापती पदावर समाधान का? मानले. याचीच चर्चा शहरात रंगली आहे.