मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेने मंगळवारी सकाळी साईबाबानगरमधील टपऱ्या हटवण्यासाठी वापरलेल्या जेसीबीवर चक्क अल्पवयीन चालक व क्लीनरला राबवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंत्राट रद्द करून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक संस्थांनी केली आहे.
मीरा रोडच्या साईबाबानगरमधील रहिवाशांनी सातत्याने वाढते फेरीवाले, गॅरेज, पडीक वाहने, टपºया, हातगाड्यांसह व्यसनींच्या उपद्रवाविरोधात तक्रारी चालवल्या होत्या. स्थानिक नगरसेवकांविरोधात नाराजी व्यक्त करत आमदार नरेंद्र मेहतांकडे कारवाई होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
रहिवाशांच्या संतापानंतर मंगळवारी पालिकेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली. परंतु, कारवाईसाठी आणलेला जेसीबी चालवणारा मिसरूड न फुटलेल्या मुलाने तर त्याच्यासोबत क्लीनर म्हणून बसलेल्या लहान बालकाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. काहींनी तर याचे व्हिडीओही काढले. बालकामगार राबवणे कायद्याने गुन्हा असताना पालिकेच्या कारवाईतच जेसीबी चालवण्यासाठी चक्क अल्पवयीन मुलांना राबवून घेण्यात आल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. जेसीबी चालवण्याचे अवघड तसेच तो हाताळणे जोखमीचे असतानाही पालिकेने मुलांना त्यासाठी जुंपल्याने संताप व्यक्त होत आहे.
जेसीबी हा पालिका कंत्राटदाराकडून घेते. त्यामुळे चालक व क्लीनरचे वय आदी खात्री करण्याची त्याची जबाबदारी आहे. चालवणारा मुलगा लहान वाटत असला तरी १८ वर्षे पूर्ण केलेले आहे. सोबत, बसलेला लहान मुलगा हा त्याचा नातलग असावा. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली याची पडताळणी करू. - दादासाहेब खेत्रे, अतिक्रमण विभागप्रमुख
मीसुद्धा जेसीबी चालवणाºया व सोबत बसलेल्या मुलाचा व्हिडीओ पाहिला आहे. महापालिकाच जर अशा जोखमीच्या कामात अल्पवयीन मुलांना राबवून घेत असेल, तर अतिशय शरमेची बाब आहे. याप्रकरणी बालकामगार कायद्यानुसार पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशा कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकले पाहिजे. - सरिता नाईक, सामाजिक कार्यकर्त्या