मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या उद्यान व रस्ता आरक्षणात झालेल्या सुमारे ३०० पक्क्या व कच्च्या बेकायदा बांधकामांवर अखेर शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात तोडक कारवाई केली. महापौर ज्योत्सना हसनाळे यांचा प्रभाग असलेल्या काशीमीरा भागात रस्ता व उद्यानाच्या आरक्षण क्रमांक ३६४ या तब्बल ६३ गुंठे इतक्या पालिका मालकीच्या जागेत भूमाफियांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे, चाळी व मोठे शेड आदी कामे केली होती . माफियांनी पालिका जागेत बेकायदा बांधकामे करून त्याची विक्री चालवली होती.
सदर अनधिकृत बांधकामे तोडून आरक्षण ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने धरणे उपशहरप्रमुख रामभवन शर्मा यांनी धरणे आंदोलन केले. पालिका जागेत बेकायदा बांधकामे करून त्याची विक्री करून भूमाफिया लोकांची फसवणूक करत असल्याने सदर बेकायदा बांधकामे पाडून माफियांवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी शर्मा हे सतत पाठपुरावा करत होते. प्रभागात भाजपाचे चार नगरसेवक व त्यातही महापौरांच्या प्रभागात झालेल्या ह्या बेकायदा बांधकाम ना त्यांचाच वरदहस्त असल्याचा आरोप शर्मा यांनी चालवला होता. या बेकायदा बांधकामवर मध्यंतरी पालिकेने कारवाई करण्यास घेतली असता माफियांनी दगडफेक करून पालिका पथकावर हल्ला चढवला होता.
पालिका जागेवर अतिक्रमण करणाऱ्यां मध्ये भूमाफिया मनोज चव्हाण, गुलाम गौस शेख उर्फ कालिया बाबू आदींची नावे आली होती. पालिका आयुक्त दिलीप ढोले व उपायुक्त मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी येथील सुमारे ३०० बेकायदेशीर बांधकामांवर तोडक कारवाई करण्यात आली. जागा मोकळी करून तेथे पालिकेचा फलक लावण्यात आला आहे. कारवाई साठी, ६३ कामगार, २ पोकलेन मशीन व ४ जेसीबी वापरण्यात आले.
प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या अभियंता व बीट निरीक्षक यांनी दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरुन त्यांच्याविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले. पोलीस उपायुक्त अमित काळे, काशीमीराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे, पालिका उपायुक्त स्वप्नील सावंत, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सर्व प्रभाग अधिकारी, पोलीस निरीक्षक माणिक पाटील व पालिका - पोलीस कर्मचारी व महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली.