अंबरनाथ : अंबरनाथ शहरासह संपूर्ण अंबरनाथ विभागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मंगळवारी रात्री उशिरा एक मेडिकल आणि एक ज्वेलर्स दुकान फोडून चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या चोरीनंतर अंबरनाथ विभागातील चोरी-घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या सर्वोदयनगर परिसरात गेटवेल मेडिकल आणि जय सद्गुरू नावाचे ज्वेलर्स दुकान आहे. या दुकानात मंगळवारी मध्यरात्री तीन चोरटे घुसले आणि त्यांनी कटरच्या साहाय्याने कुलूप, ग्रील आणि शटर तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर मेडिकलच्या दुकानातून ३० हजार रुपये रोख आणि काही सामानही चोरून नेले. तर जय सद्गुरू ज्वेलर्समधून तब्बल १८ तोळे सोने, तीन ते चार किलो चांदी यावर चोरट्यांनी डल्ला मारला. धक्कादायक बाब म्हणजे चोरी करून परत जाताना दोन्ही दुकानांतले सीसीटीव्हीचे डीव्हीआरही हे चोरटे सोबत घेऊन गेले. शेजारच्या दुकानातील सीसीटीव्हींत हे चोरटे दुकानात शिरताना कैद झाले आहेत.