ठाणे : भांडुप येथील सुवर्ण कारागिरासोबत ठाण्यात जेवण्यासाठी आलेला त्याचा मित्र दागिने आणि रोकड ठेवलेली कार घेऊन आठ दिवसांपूर्वी पळाला होता. वागळे इस्टेट पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली.भांडुप येथील पाटकर कंपाऊंडमध्ये राहणारे सुवर्ण कारागिर सोहनसिंग मदनसिंग राजपूत (३८) हे २७ डिसेंंबर २0१७ रोजी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास ठाण्यातील वागळे इस्टेटमधील गोपाळ आश्रम हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले. राजपूत यांचा भांडुप येथील परिचित नविन तुळशीराम इंगळे (३0) हादेखील त्यांच्यासोबत होता. राजपूत यांनी त्यांची मोटारसायकल हॉटेलबाहेर ठेवली होती. मोटारसायकलच्या डिक्कीत ४३ हजार रूपये रोख आणि दीड लाख रुपयांचे दागिने होते. जेवण झाल्यानंतर राजपूत हात धुण्यासाठी बेसिनजवळ गेले. त्यावेळी आरोपी नवीन इंगळे टेबलवरच बसला होता. राजपूत हात धुण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या मोटारसायकलची चावी टेबलवरच होती. ती चावी घेऊन आरोपीने पळ काढला. या अनपेक्षित प्रकारामुळे राजपूत गोंधळले. त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याने मोटारसायकल आणि ऐवज आज-उद्या देतो असे सांगून टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. अखेर राजपूत यांनी सोमवारी याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांनी आरोपीला मंगळवारी अटक केली. राजपूत यांच्या मोटारसायकलमधील ऐवज पाहून मोह आवरला नाही. म्हणून आपण चोरी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.आरोपीची चौकशी सुरू आहे. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे महत्वाचे आहे. आरोपीला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमि नसल्याची माहितीही तपास अधिकारी अनिकेत पोटे यांनी दिली.
भांडुपच्या सुवर्ण कारागिराचे दागिने, रोकड ठेवलेली मोटारसायकल मित्राकडून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 7:19 PM
भांडुपच्या एका सुवर्ण कारागिराला त्याच्या मित्रानेच फटका दिला. दागिने आणि रोकड ठेवलेली या कारागिराची मोटारसायकल त्याच्या मित्राने ठाण्यातून चोरली.
ठळक मुद्देगुन्हा दाखलआरोपीस अटकगुन्हेगारी पार्श्वभूमि नाही