----------------
चोरटा पकडला
कल्याण : पश्चिमेतील भारताचार्य वैद्य चौक जानकीदास शेल्टर येथील शैलजा कदरकर यांच्या घरात घुसून ५७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून पलायन करणाऱ्या राहुल मुकनार उर्फ राहुल हाल्या दिवा (रा. विरार) या चोरट्याला पकडून बाजारपेठ पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. त्याचा सहकारी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. हा प्रकार सोमवारी दुपारी १.३० ते ३ च्या दरम्यान घडला. घरात चोर घुसल्याचे निदर्शनास येताच शैलजा यांनी त्यांना विरोध केला. अटकाव झाल्यावर दोघा चोरट्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील राहुलला तरुणांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
---------------------
रिक्षा चोरीला
कल्याण : संजय चौधरी यांनी त्यांची रिक्षा ते राहत असलेल्या पूर्वेतील चिंचपाडा रोडवरील ओम यशोधरा सोसायटीच्या समोरील रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. तेथून ती २९ जूनच्या मध्यरात्री चोरीला गेली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------
बतावणी करीत लुबाडले
डोंबिवली : उर्मिला गुप्ता या नऊ वर्षांच्या नातीसह पूर्वेतील लेवा भवन परिसरातून सोमवारी दुपारी १२ वाजता जात असताना दोघा भामट्यांनी त्यांना अडवून आम्हाला ठाण्याला जायचे आहे. कसे जायचे? आमच्याकडे तिकिटासाठी पैसे नाहीत, असे बोलण्यात गुंतविले. तसेच त्यांना रुमालात दागिने काढण्यास सांगून ते रुमालात बांधण्याचा बहाणा करत ७५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात उर्मिला यांनी तक्रार दिली आहे.
----------------------------------------
मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
डोंबिवली : ‘आज माल का आणला?’ अशी विचारणा केली म्हणून रागाच्या भरात संदीप पाटील याने पांडुचंदू नाईक यांना लोखंडी जॅकने मारहाण केल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजता पश्चिमेतील नेमाडे गल्ली येथे घडली. नाईक यांच्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी नाईक यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
------------------
तंबाखूचा माल जप्त
कल्याण : शाळेपासून ठरावीक अंतरावर गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी विक्री करण्यास मनाई असताना विमल पान मसाला आणि तंबाखू विकणाऱ्या मोहमद खान याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक हजार ४५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २ जुलैला पश्चिमेतील वल्लीपीर रोड येथील गुजराती शाळेजवळ करण्यात आली.
----------------------
सराईत चोरटा गजाआड
कल्याण : संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दीपक सिंग याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. २ जुलैला मध्यरात्री ३ च्या सुमारास तो पश्चिमेतील नानासाहेब धर्माधिकारी रोडलगत मोहिंदरसिंग काबलसिंग शाळेसमोर फिरताना आढळून आला. दीपक हा सराईत चोरटा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------
लोखंडी कटर जप्त
कल्याण : पश्चिमेतील फडके मैदानासमोर सोनवणे कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर शुक्रवारी अंधारात मोनू शर्मा हा फिरताना बाजारपेठ पोलिसांना आढळून आला. संशयावरून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कटर सापडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला अटक करून त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
---------------------