भिवंडी : शांतीनगर पोलिसांनी एका घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात गुन्हा उघडकीस आणत दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळत त्यांच्या जवळून घरफोडी मध्ये चोरी केलेले १ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तर ३४ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतीनगर पोलिसांनी यश आले असल्याची माहिती शांतीनगर पोलीसांनी गुरुवारी दिली आहे.
शांतीनगर परिसरातील चाळीत राहणाऱ्या शाईन खातुन मोहमद हासीन अन्सारी या आपल्या कुटुंबीयांसह हाजीमलंग येथे मुक्कामी गेल्या होत्या.तेथून घरी परतल्यावर घराचे कुलूप तुटलेले दिसले.घरात जाऊन बघितले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडुन कपाटातील १ लाख ६१ हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे वेगवेगळे दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले.याप्रकरणी त्यांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निलेश बडाख,पोलिस उप निरीक्षक सुरेश घुगे व तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गव्हाणे,पोलिस नाईक किरण जाधव,पोलिस शिपाई नरसिंग क्षिरसागर, रविन्द्र पाटील,तौफीक शिकलगार या पोलिस पथकाने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन घटना स्थळाचे आजुबाजुचे परिसरातील गुप्त बातमी दाराकडे माहीती घेतली असता रेहान व दानिश उर्फ गुडडु नाटया या दोघा संशयितांची नावे समोर आली.
त्यानंतर पोलिस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी भादवड पाईप लाईन भागात लपुन बसल्याचे माहीती मिळाली असता पोलिस पथकाने भादवड पाईप लाईन भागात सापळा लावुन आरोपी मोहम्मद रेहान अन्सार आलम अन्सारी वय २१ वर्ष, व मोहम्मद दानिश रियाज अहमद अन्सारी वय २८ वर्ष दोघे रा. गायत्रीनगर भिवंडी यांना गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सहा तासात ताब्यात घेऊन त्यांना पोलिस खाक्या दाखवत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिले. त्यांनी चोरी केलेले सोन्याचे दागिने घरतीला स्पिकर बॉक्स मध्ये लपवुन ठेवले होते हे सर्व सोन्या चांदीचे दागिने शांतीनगर पोलिसांनी जप्त केले आहेत.