ठाणे : मोबाइलचे बेकायदेशीर सीडीआर (कॉल डिटेल्स) काढल्याप्रकरणी मुंबईतून जिग्नेश छेडा (३२, रा. कांदिवली) या आणखी एका खासगी गुप्तहेराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १च्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. त्याला १७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तर गुरुवारी अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ हिचीही कसून चौकशी करण्यात आली.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने यापूर्वीच माकेश पांडेय याला नवी मुंबईतील वाशीतून अटक केली होती. माकेशकडूनच जिग्नेशने दोन वेगवेगळे सीडीआर मिळविले होते. माकेशच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर ठाणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर या प्रकरणी जिग्नेशला ११ एप्रिल रोजी ठाकरे यांच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडे आणखी चौकशीसाठी त्याच्या पोलीस कोठडीची ठाणे पोलिसांनी न्यायालयाकडे गुरुवारी मागणी केल्यानंतर त्याला कोठडी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत प्रख्यात गुप्तहेर रजनी पंडित, अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यासह १२ तर आसाम पोलिसांनी एक पोलीस शिपाई अशा १३ जणांना अटक केली आहे. अॅड. रिझवान यांना मात्र पोलीस कोठडी मिळालेली असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांची पोलीस कोठडी तीन दिवसांनी रद्द करण्यात आली होती.आयशा श्रॉफची चौकशीबेकायदेशीर सीडीआर प्रकरणी अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ यांचीही गुरुवारी पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह अधिकाऱ्यांनी चौकशी केली. यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी सीडीआर मिळवून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, सीडीआर काढण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे समजल्यानंतर आपण वकीलच बदलल्याचेही तिने मान्य केले.
सीडीआर प्रकरणी जिग्नेश छेडा या गुप्तहेरास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:35 AM