मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड गेल्या काही दिवसांमध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. हर हर महादेव चित्रपटाला विरोध करताना ठाण्यातील चित्रपटगृहात प्रेक्षकाला झालेली मारहाण आणि नंतर मुख्यंमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी घडलेल्या घटनेनंतर एका महिलेले केलेल्या विनयभंगाच्या आरोपामुळे आव्हाडांपुढील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, आपल्याविरोधात राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे नोंदवण्यात आले असून, त्याविरोधात काही संतप्त सवाल आव्हाड यांनी ट्विट करून उपस्थित केले आहेत.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उद्या या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात तसे ते कागदपत्रे बनवतात. म्हणजे हा गरीब बिचारा मारला जाईल आणि वरचे अधिकारी हात वर करून मोकळे होऊन जातील.
आता या प्रकरणात काय करावे हे सुचत नाहीये. आपल्या हक्कासाठी त्या गरीबांना फासावर लटकवावे, कि या वरच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लढाई करावी. अर्थात त्यांचा काय दोष? आदेश कुठून आले हे महाराष्ट्राला माहीत आहे. असे सूचक विधानही आव्हाड यांनी आपल्या ट्विटमधून केले आहे.