ठाणे : ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष आगामी सर्व निवडणुका एकत्रच लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात केली. तसेच या जिल्ह्यात मविआ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष मोठा भाऊ आहे. त्यामुळे येत्या काळात ठाणे महापालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा फडकवायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बुधवारी ठाण्यात घेण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची एक पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आव्हाड यांनी ही घोषणा केली. लवकरच ठाण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थितीत राहतील असा दावाही त्यांनी केला आहे. येत्या वर्षभरात महाविकास आघाडीचे आम्ही सर्व प्रमुख नेते संपूर्ण जिल्ह्यात फिरून प्रचार करणार आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन ही जागांवर महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्याला निवडून आणू अशी ग्वाही ही त्यांनी दिली. केवळ लोकसभाच नाही तर विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीतही आम्ही तीन ही पक्ष महाविकास आघाडी म्हूणन सामोरे जाऊ.
ठाणे जिल्ह्यात जिंकायचे असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा आम्हाला खांद्यावर घ्यावाच लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ठाणे महापालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला फडकावयाचा आहे. त्यानुसार सर्वांनी कामाला लागले पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. सध्या लोकसभा निवडणुकीचा जो सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेत इंडिया आघाडीवर असून देशातील लोकांची मानसिकता बदलायला लागली आहे. असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष सुहास देसाई, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थितीत होते.
त्या वाघ नखांचा शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही
महाराष्ट्रात जी वाघ नखे आणली जात आहेत, त्या वाघ नखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नसल्याची माहिती यावेळी आव्हाड यांनी दिली. जेथून ही वाघ नखे आणली जात आहेत, त्याच ठिकाणात तसा उल्लेख करुन ठेवला असल्याचाही दाखला त्यांनी यावेळी दिला. बिहारमध्ये ज्या पध्दतीने जात निहाय सर्व्हे जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात देखील राज्य सरकारने तो जाहीर करावा असे आव्हान आव्हाड यांनी सरकाराला दिले.
होऊ द्या चर्चा अभियान ठाण्यात बंद करण्याचा घाट, राजन विचारे यांचा गंभीर आरोप
१ ऑक्टोबर पासून ठाण्यात विविध भागात होऊ द्या चर्चा हे अभियान सुरु करण्यात आले आहे. परंतु पोलिसांनी वाहतुक कोंडी होते म्हणून नोटीस बजावली आहे. तसेच हे अभियान थांबविण्यास सांगितले आहे. परंतु मिंधे सरकाराच्या माध्यमातून हे अभियानच ठाण्यात बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे. दुसरीकडे अशा पध्दतीने जरी पोलिसांनी वटहुकम काढला असेल तरी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आता मोठ्या संख्येने गर्दी करुन हे अभियान यशस्वी करुन दाखवावे असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना केले. तसेच यापुढे साधी एनसी जरी दाखल झाली तरी त्याच्याविरोधात तीनही पक्ष एकत्रित पोलीस ठाण्यात जाऊन जाब विचारतील असेही त्यांनी स्पष्ट केले.