"जितेंद्र आव्हाड वैफल्यग्रस्त", आनंद परांजपे यांची टीका
By अजित मांडके | Published: July 11, 2024 04:07 PM2024-07-11T16:07:10+5:302024-07-11T16:07:46+5:30
"जितेंद्र आव्हाड हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. २०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून?"
ठाणे : जितेंद्र आव्हाड हे वैफल्यग्रस्त झाले आहेत. २०० कोटींमध्ये इमेज मेकओव्हर हा आरोप कथा कल्पित असून हा आकडा आला कुठून? २०१९ साली ज्यावेळेला राष्ट्रवादीने मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये आमदारांना ठेवले होते ते हॉटेल राष्ट्रवादी शरद पवार गटाने विकत घेतले असं म्हणायचे का? त्यामुळे बेसलेस आरोपांना मी काही फारसे महत्त्व देत नसल्याची टीका अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड सातत्याने खोटे आरोप करत असतात. लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये स्वत:ला मोठा भाऊ समजायला लागली आहे. ते विधानसभेला २८८ उमेदवार उभे करायचा विचार करत आहेत. काँग्रेसचा एखादा सच्चा कार्यकर्ता मुंब्रा कळव्यातून तिकीट मागत नाही ना? याकडे आव्हाडांनी लक्ष द्यावे अशी सुचनाही त्यांनी केली. काँग्रेसचे ठाण्यातील नेते सातत्याने आव्हाडांनी ठाण्यातील काँग्रेस संपवल्याचे आरोप करीत असतात. निधी मिळत नसल्याच्या आरोपही तत्थ नसल्याचा दावा परांजपे यांनी केला आहे.
मी, नजीब मुल्ला आणि स्थानिक नगरसेवकांच्या मागणीनुसार ५० कोटीचा विकास निधी आला आहे व तो खºया विकासासाठी निधी वापरला जाईल. आव्हाड यांच्या माध्यमातून निधी दिला तर एका ठराविक ठेकेदाराला कामे दिली जातात. निधीच्या बाबतीत महायुतीकडून कोणताही भेदभाव नाही. आतापर्यंत १०५ कोटी रुपये मुंब्रा-कळव्या साठी निधी आल्याची माहिती त्यांनी दिली.
अजित पवार यांनी राज्यातील माता भगिनी, बळी राजा व सर्व घटकांना सुख समृद्धी लाभो, यासाठी सिद्धीविनायकाकडे साकडे घातले. १४ जुलै रोजी बारामतीमध्ये सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभेच्या तयारीला लागली आहे. लपून छपून नाही तर मीडिया आणि सर्व आमदारांना घेऊन दर्शनाला गेले. काही जण लपून छपून शनी अमावस्येला शनी शिंगणापूरला दर्शन घेतात. घड्याळ चिन्ह आम्हाला मिळेल याची खात्री असल्याचेही ते म्हणाले.