ठाण्याजवळील मुंब्रा रेल्वे स्टेशनचं नामकरण मुंब्रादेवी करावं, अशी मागणी भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केल्याने एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मोहित कंबोज यांनी केलेल्या या मागणीला कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. आता या मुद्द्यावरून मोहित कंबोज आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.
मुंब्रा रेल्वे स्थानकाचं नाव येथील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या मुंब्रादेवीच्या नावावरून मुंब्रादेवी असं करावं, अशी मागणी मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्याला आक्षेप घेतला होता.
यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, मुंब्रा हे एक महसुली गाव होते. त्याचं नाव मुंब्रा देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर येथील रेल्वेस्टेशनलाही तेच नाव देण्यात आलं. आता महालक्ष्मी स्टेशनचं नामकरण तुम्ही महालक्ष्मी देवी असं करायला सांगणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटला मोहित कंबोज यांनी पुन्हा उत्तर दिलं आहे. आव्हाड साहेब मुंबा स्टेशनचं नामकरण मुंब्रादेवी झाल्यास अडचण काय आहे. यात देवीचं नाव येत असल्यानं तुम्ही विरोध करत आहात का? याआधीही अनेक स्टेशनची नावं बदलण्यात आली, तेव्हा तर प्रश्न निर्माण झाला नव्हता. आज मी मुंब्रा स्टेशनचं नाव मुंब्रादेवी करण्यात यावं, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करतो, असे मोहित कंबोज म्हणाले.