ठाणे – कळवा रुग्णालयात एका रात्रीत १८ रुग्ण दगावल्यावरून विरोधकांनी सत्ताधारी सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला आहे. ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे. श्रीराम जयराम. या प्रकाराची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा २ दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच बेशरमपणाची हद्द आहे. ५ मृत्यूनंतर आम्ही येऊन गेलो, बडबडलो, कुणीही दखल घेतली नाही. ज्यांचे हॉस्पिटलमध्ये काम नाही त्यांना इथं बसवलंय. मृत्यूची जबाबदारी स्वीकारावीच लागेल. प्रत्येक रुग्ण गोरगरिब घरातील आहे. इथे वाडा, मोखाडा, पालघर येथून आदिवासी रुग्णही येतात. या लोकांचे जेवणही प्रशासन खाते. लोकं गंभीर झाल्यावरच हॉस्पिटलमध्ये येतात. लोकं जन्माला आली, मरणारच आहे असा हिशोब प्रशासनाची बाजू घेणाऱ्यांना वाटतं. बेशरम प्रशासन आहे. आजही हॉस्पिटलमध्ये नर्सेस कमी आहे. डॉक्टरांची कमतरता आहे. गरीब लोकं मरण्याची जन्माला येतात का? असा सवालही जितेंद्र आव्हाडांनी विचारला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी ५ मृत्यूनंतर बैठक घ्यायला हवी होती. हे शहर मुख्यमंत्र्यांचे आहे. शहरातील लोकांची अपेक्षा आहे. पण कुठलीही पूर्तता मुख्यमंत्र्यांनी केली नाही. प्रशासनाची चावी माझ्या हातात नाही. चेहऱ्यावरील भावनाही डीनच्या हालत नाही. ७ तास एका बेडवर मृतदेह पडलेला असतो. जिवंत रुग्णाच्या बाजूला मृतदेह ठेवला जातो. थोडी तरी माणुसकी बाळगा असाही घणाघात आव्हाडांनी प्रशासनाला विचारला.