ठाणे : एसी लोकलचे तिकीट भरमसाठ आहे. साध्या लोकलने प्रवास करणाऱ्यांना ते परवडू शकत नाही. एसी लोकलविरोधात नुकतीच झालेली आंदोलने ही प्रवाशांच्या मनातील खदखद आहे. रेल्वेने ती गांभीर्याने समजून घ्यावी, नाहीतर शेकडो प्रवाशांचे आंदोलन हजारो प्रवाशांत रूपांतरित होऊ शकते, असा इशारा माजी गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी दिला. प्रवाशांच्या प्रश्नावर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीला दांडी यात्रेप्रमाणे रेल मार्च काढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
गर्दीच्यावेळी साध्या लोकमलमध्ये सुमारे सहा हजार प्रवासी असतात. मात्र तेवढे प्रवाशी नेण्याची एसी लोकलची क्षमता नाही. तेवढे प्रवासी एसीत शिरले, तर ते गुदमरण्याची भीती आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गर्दीच्या वेळी एसी लोकल चालवू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले. कळव्यातील कावेरी सेतू येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर त्यांनी संवाद साधला. संतप्त प्रवासी एक दिवस चालत रेल्वे ट्रॅकवरून जातील. तेव्हा काय कराल? असा सवालही त्यांनी केला.
उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनीही प्रवाशांवर लादलेल्या एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. मुंब्रा प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी ए. आर. पठाण यांनी मुंब्रा आणि कळव्यामध्ये सेमी फास्ट गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव यांच्यासह प्रवाशांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.
दाेनशे रुपये दिवसाला कसे परवडणार? कोरोना काळात आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या प्रवाशांना एसी लाेकलचे एका दिवसाचे दोनशे रुपयांचे तिकीट कसे परवडेल? एसीच्या एका लोकलमधून केवळ ६००, तर साध्या ट्रेनमधून सहा हजार प्रवासी प्रवास करतात. साध्या लोकलचा पास दोनशे, तर एसीचा महिन्याचा पास १ हजार ८०० रुपये हे कसे परवडणार, असा सवालही आव्हाड यांच्यासह प्रवाशांनी केला
आवाजाविरोधात नोटीस द्या पारसिकच्या बोगद्यातून पूर्वी मेल-एक्स्प्रेस जात होत्या. त्यांना तो मार्ग राखून ठेवलेला असताना त्या लोकलच्या मार्गावरूनच नेल्या जातात. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो. शिवाय त्यांचा आवाज १७५ डेसिबल्सपेक्षा अधिक आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रात्री १० नंतर ४५ डेसिबलपेक्षा अधिकआवाज नको. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्याकडे तक्रार करीत रेल्वेला याबाबत नोटीस बजावण्याचा आग्रह त्यांनी रेल्वे प्रवाशांसमोर धरला.