ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे किमयागार आहेत. जे काम कोणाकडूनही होणार नाही; ते काम तेच करु शकतात, हे आपण सर्वांनी पाहिले आहे. माणसामधील क्षमता आणि गुणवत्ता पडताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच माझ्यातील क्षमता ओळखून समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचे घर मिळवून देण्यासाठीच माझ्याकडे गृहनिर्माण हे खाते शरद पवार यांनी दिले आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ अभियानांतर्गत कार्यकर्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपीय सत्रात ना. डॉ. जितेंद्र आव्हाड हे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, उथळसर प्रभाग समितीच्या सभापती वहिदा खान, महिला व बालकल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर, नगरसेवक बाबाजी पाटील, नगरसेविका सुनीता सातपुते आदी उपस्थित होते.
डॉ. आव्हाड म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून टीव्हीवर बोंबाबोंब सुरु आहे. मात्र, आपण ठामपणे सांगत आहोत की, 99 टक्के आघाडी होणारच आहे. काहीजण असे आहेत की दुधात मिठाचा खडा टाकून आघाडी करु नका, असे सांगत आहेत. मात्र, त्यांना मी सांगू इच्छितो की, आपला खरा वैचारिक शत्रू हा भाजप आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपणाला दोन पावले मागे यावे लागले तरी हरकत नाही. आता आपणाकडे केवळ 90 दिवस आहेत. या 90 दिवसांत आपणाला खूप काम करायचे आहे. प्रत्येक बूथनुसार रचना लावायची आहे. प्रत्येक बुथ मागे 10 जणांनी काम केले पाहिजे. 26 जानेवारीपर्यंत बूथची रचना करण्याची गरज आहे. पवारसाहेबांना या निवडणुकीत आपण कमाल करुन दाखवू, याच त्यांना शुभेच्छा असणार आहेत. आजच्या मेळाव्यात किती लोक आले आहेत, याला महत्व नाही. कारण, लाखोंच्या सभेत आलेले लोक मतांमध्ये रुपांतरीत होत नाहीत. लोकांसाठी काम करता आले पाहिजे. लोकांमध्ये जाऊन नोटाबंदी, महागाई आदी विषयांची माहिती जनतेला दिली पाहिजे. त्याची सुरुवात आजपासून सुरु करायची आहे.गोरगरीब जनतेच्या घरांसंदर्भात डॉ. आव्हाड यांनी, मध्यमवर्गीयांच्या घरांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी माझी आहे. मध्यमवर्गीयांना स्वस्तात घरे देण्याचे काम मी हाती घेतले आहे. समाजातील शेवटच्या माणसाला घर देण्याची जबाबदारी माझी आहे. ती आपण पूर्ण करणारच, असे सांगितले.
दरम्यान, तत्पूर्वी शिव-शाहू-फुले-आंबेडकर ते शरद पवार या विषयावर पत्रकार संजय भालेराव; कृषी कायदे या विषयावर किसान सभेच्या नेत्या प्राची हातिवलेकर, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर या विषयावर अॅड. राजा कदम आणि शरदचंद्र पवार यांचे महिला धोरण या विषयावर अंगणवाडी कर्मचारी नेते एम.ए. पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ठाणे परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, शमीम खान, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, विद्यार्थी सेलचे प्रफुल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष रमेश दोडके, असंघटीत सेलचे अध्यक्ष राजू चापले, लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. विनोद उतेकर आदी प्रदेश पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. आनंद परांजपे यांचे कौतूक
आनंद परांजपे यांना बूथ रचनेबद्दल काही सूचना देण्याची गरज नाही. ते त्यामध्ये माहीर आहेत. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे. 24 तास पक्षासाठी काम करणारे ते जिल्हाध्यक्ष आहेत. शरद पवारसाहेबांनीच त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. अत्यंत शांतपणे नियोजन करुन काम करण्याची कला त्यांना अवगत आहे, अशा शब्दात डॉ. आव्हाड यांनी आनंद परांजपे यांचे कौतूक केले.