ठाणे :
ठाण्यातील एका मॉलमधील चित्रपटगृहात प्रेक्षकाला मारहाण करणारे माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अटक केली. अटकेनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यातच वेळ गेल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे आव्हाडांसह १२ कार्यकर्त्यांची शुक्रवारची रात्र पोलीस कोठडीतच गेली.ठाण्यातील मॉलमधील ‘हर हर महादेव’ हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षक दाम्पत्याला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी आव्हाड, तसेच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह १०० जणांविरुद्ध ८ नोव्हेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. आव्हाड यांच्यासह परांजपे, तसेच अन्य नऊ अशा ११ जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आव्हाड यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करीत त्यांच्या सुटकेची मागणी केली. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सुमारे एक वाजता त्यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांचा फोन आला. नोटीस देण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस ठाण्यात या, असे निकम त्यांना म्हणाले. त्यावर आव्हाड यांनी आपण मुंबईला जायला निघाल्याने आपण पोलीस ठाण्यात येऊन नंतर मुंबईला जाऊ, असे मान्य केले. पोलीस ठाण्यात गेलेल्या आव्हाड यांना निकम यांनी गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड हे अल्पावधीत तेथे पोहोचले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर आपल्याला अस्वस्थता, तसेच हतबलता दिसत होती. आपण काही करू शकत नाही. वरून आदेश आल्याने तुम्हाला अटक करावी लागेल, असेही राठोड म्हणाल्याचा उल्लेख आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये केला.
हा पोलीस बळाचा गैरवापर आहे. मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल; पण मी जे केले नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी आपल्या अटकेनंतर ट्विटद्वारे व्यक्त केली.