-अजित मांडकेठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांच्या गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केलेल्या तक्रारींमुळे वरवर सारे काही आलबेल वाटणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष दृगोचर झाला आहे. येत्या निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांचे ठाण्यातील राजकारणात सक्रिय होणे, नगरसेवकांनी तक्रारी करणे, हा आव्हाड यांच्याकरिता सूचक इशारा आहे. मुंब्रा मतदारसंघातील राजकारणात आव्हाडांना गुंतवून ठेवणे, ही भाजपाची खेळी आहे. मात्र, सध्या आव्हाड हे ठाण्याचे नव्हे तर मुंब्रा येथील नेते होऊन विरोधकांच्या पथ्यावर पडणारे राजकारण तर करत नाहीत ना?ठाणे शहर राष्टÑवादी काँग्रेसमध्ये आतापर्यंत सारेकाही आलबेल असताना अचानक १० नगरसेवकांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला. वरकरणी अन्य नेत्यांबाबत तक्रारी केल्याचे भासवले जात असले, तरी नगरसेवकांचे टार्गेट आव्हाड हेच होते, अशी माहिती हाती आली आहे. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर दिसत असताना ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस केवळ मुंब्य्रापुरती सीमित राहिली आहे, असा या नगरसेवकांचा मुख्य आक्षेप आहे. कळव्याकडेही फारसे लक्ष दिले जात नाही. परिणामी, ठाण्यात राष्टÑवादीचे अस्तित्व शून्य झाले असल्याची तक्रार या नगरसेवकांनी केली. त्यांनी घेतलेल्या या आक्षेपांमध्ये काही प्रमाणात तथ्य आहे. अनेक महत्त्वाची पदे, महत्त्वाची कामे ही केवळ मुंब्य्रातच होत असल्यामुळे ठाणे शहरात जर राष्टÑवादी वाढवायची असेल, तर अधिक व्यापक विचार करायला हवा, अशी नगरसेवकांची मागणी आहे.संपूर्ण देशात, महाराष्टÑात मोदीलाट असताना ठाणे महापालिकेतही ही लाट चालेल, अशी चर्चा होती. परंतु, या चर्चेला छेद देत आणि पक्षातील विद्यमान १० ते १२ नगरसेवक इतर पक्षांत गेल्यानंतरही ठाण्यात राष्टÑवादीने ३५ नगरसेवकांपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे भाजपा तिसºया क्रमांकावर फेकला गेला. विरोधी पक्ष म्हणून राष्टÑवादीने पुन्हा ठाणे महापालिकेत आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. एवढी चांगली राजकीय पार्श्वभूमी असताना अचानक पक्षात कुरबुरी का सुरू झाल्या, हेच आश्चर्यजनक आहे. ठाण्यातील राष्टÑवादी ही तीन गटांत विभागली असतानाही महापालिकेत यश लाभले. निवडणुकीनंतर ठाण्यातील राष्टÑवादीमधील गटातटांचे राजकारण संपुष्टात आल्याची चर्चा होती. परंतु, आता सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजू लागताच गणेश नाईक फॅमिली पुन्हा एकदा ठाण्यात सक्रिय झाली. राष्टÑवादीच्या शहराध्यक्षपदी आनंद परांजपे यांची फेरनिवड झाली. मात्र, त्याचवेळी कार्याध्यक्षपदी संजय वढावकर यांची पक्षश्रेष्ठींनी निवड केली. त्यानंतर, नाराज मंडळींनी मोर्चेबांधणी सुरू केली. काही नाराजांची मनधरणी करण्यासाठी पक्षाने नजीब मुल्ला, सुहास देसाई यांना प्रदेशस्तरावर घेतले. परंतु, नगरसेवकांनी आपल्या मनातील खदखद दाबून ठेवली होती. गुरुवारी या नाराजांना नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांच्यासह पवार यांची भेट घेण्याची संधी प्राप्त झाली. या नाराजांमध्ये मुंब्य्रातील तीन ते चार नगरसेवकांचा समावेश होता. सुहास देसाई यांना थेट प्रदेशस्तरावर बढती दिल्याचा आक्षेपही नाराजांनी व्यक्त केला.आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचा दोस्ताना २० वर्षांचा आहे. मुल्ला परमार प्रकरणात अडचणीत आले, तेव्हाही आव्हाड यांनी त्यांची पाठराखण केली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत मुल्ला यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना पंख फुटले असून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, अशी मुल्ला यांची अपेक्षा असल्याची चर्चा आहे. शहरातील पक्ष किंवा महापालिकेतील विरोधक या नात्याने असलेली सत्ता यापैकी काहीच हाती लागत नसल्याने मुल्ला हे आक्रमक झाल्याची चर्चा आहे. आव्हाडांना शह देण्याकरिता घडवलेल्या भेटीला या नाराजीमुळे बळ मिळाले आहे. आव्हाड हे राष्टÑवादीचे खमके नेते आहेत. विद्यमान सत्ताधारी भाजपाला व त्यांच्या परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांना अंगावर घेण्याची ताकद आव्हाड यांच्याकडे आहे. राष्ट्रवादीचे अन्य नेते छगन भुजबळ यांची अवस्था पाहून भाजपाबाबत बोटचेपी भूमिका घेत असताना आव्हाड थेट हल्ला करतात. त्यामुळे भाजपाचे नेते त्यांना पाण्यात पाहतात. त्यामुळे राष्ट्रवादीतूनच आव्हाड यांना शह देण्याची व येत्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघात खिळवून ठेवण्याची खेळी भाजपाच्या धूर्त नेत्यांनी खेळली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.आव्हाड यांचे लक्ष संपूर्ण ठाण्यावर असणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांनी स्वत:ला आपल्या मतदारसंघापुरते मर्यादित केल्याने हा पेच निर्माण झाला आहे. म्हणजे एका परीने भाजपाला ज्या सापळ्यात आव्हाड यांना अडकवायचे आहे, त्यात ते स्वत:हून अडकत तर नाही ना? महापालिका निवडणुकीत शहरात राष्टÑवादी पिछाडीवर पडली होती. जगदाळे आणि मुल्ला यांनी आपल्या स्वत:च्या जिगरवर त्यांच्या प्रभावक्षेत्रातून नगरसेवक निवडून आणले.परंतु, शहराच्या इतर भागांत राष्टÑवादीची सपशेल पीछेहाट झाली. या अपयशाचे खापर आव्हाड यांच्या माथ्यावर फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध विषय समित्या किंवा इतर महत्त्वाची पदे केवळ मुंब्य्रातील राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांना दिल्याने या नाराजीत भर पडली आहे. ठाण्यातील पदाधिकाºयांना पदे देताना डावलले जात असल्याचा ठपका आव्हाडांवर ठेवण्यात आला आहे.कळव्यामध्ये राष्टÑवादीचे नगरसेवक असतानासुद्धा या भागाला केवळ विरोधी पक्षनेतेपदावरच समाधान मानावे लागले आहे. ठाण्याच्या मुख्य भागात राष्टÑवादी कशी वाढेल, तेथील पदाधिकाºयांना कसे विश्वासात घेतले जाऊ शकेल, पक्षवाढीसाठी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवे आहेत, याचा कोणताही विचार होताना दिसत नाही, असा सूर या मंडळींनी लावला आहे.>आताच हे आक्षेप का घेतले जात आहेत, आव्हाडांच्या नेतृत्वावर अविश्वास का दाखवला जात आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकतर, वढावकर यांच्या निमित्ताने ठाण्याच्या राजकारणात गणेश नाईक यांना पुन्हा घुसखोरी करण्याची संधी प्राप्त झाली आहे. साहजिकच, येथील नाराजी हेरून नाईक यांनीच नाराजांना पवार यांच्या दरबारात उभे केले आहे. एकेकाळी ठाण्याच्या राजकारणात आव्हाड विरुद्ध डावखरे हा संघर्ष होता.तिसरा संघर्षाचा कोन हा नाईक यांचा होता. डावखरे फॅक्टर आता राष्ट्रवादीत नसल्याने थेट आव्हाड विरुद्ध नाईक असाच संघर्ष राहणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व गटातटांना सांभाळण्याकरिता पवार यांनी ठाण्यावरील आव्हाडांचा वरचष्मा सैल केला आहे. आता आव्हाड यातून कसा धडा घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
विरोधकांना घेरण्याची संधी जितेंद्र आव्हाडांनीच दिली?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 3:47 AM