ठाणे: राष्ट्रवादीचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तात्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. वैभव कदम हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी होते. त्यावेळेस त्यांना अटक होऊन त्यांची जामीनावर सुटकाही झाली. निळजे ते तळोजा या दोन रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली.
करमुसे प्रकरणात वैभव कदम यांची गेल्या अनेक दिवसापासून चौकशी सुरू होती. त्यामुळे ते मानसिक तणावात असल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्महत्या पूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर ठेवलेल्या स्टेटस मुळे आता चर्चा रंगली आहे. “मला माफ करा यात माझा दोष नाही, मी डिप्रेशन मुळे हा निर्णय घेत आहे, पोलीस आणि मीडियाला एकच विनंती आहे की मी आरोपी नाही आहे," अशा आशयाचे स्टेटस ठेवून त्याने आत्महत्या केली आहे. शेवटच्या स्टेटसमध्ये मी आरोपी नाही आहे असं वैभव कदम म्हणत आहेत. मात्र त्यांना आरोपी कोण ठरवत होतं याची चर्चा रंगली आहे. याच प्रकरणांमध्ये इतर लोकांची चौकशी सुरू आहे, यामध्ये काही अंगरक्षकदेखील आहेत.
वैभव कदम यांना पोलिसांकडून त्रास दिला जात होता. वारंवार चौकशीला बोलावलं जात होतं. आणि यामुळे तो डिप्रेशनमध्ये येऊन त्यांनी हे पाऊल उचलल्याचे काही अंगरक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. आता चौकशी सुरू असताना पोलिसांवर कोणता राजकीय दबाव होता का? याची देखील चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. आता या प्रकरणाचा तपास ठाणे रेल्वे पोलीस करत आहेत. हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल.